कोण आला रे कोण आला? मावळचा वाघ आला!!

कोण आला रे कोण आला? मावळचा वाघ आला!!

पिंपरी : मावळचे (जि. पुणे) भाजप आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्या शपथविधीप्रसंगी `कोण आला रे,कोण आला मावळचा वाघ आला` अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. तुकोबारायांची समाधी असलेल्या श्रीक्षेत्र देहूचा समावेश असलेल्या मावळ मतदारसंघाला आषाढी वारीच्या तोंडावर मंत्रीपद मिळाल्याने तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचाही जयघोष करण्यात आला.

आज राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. त्याचा शपथविधी मुंबईत राजभवन येथे झाला. त्यात मावळातून सलग दोनदा निवडून आलेले भेगडे यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. या शपथविधीला भेगडेंचे नाव पुकारताच शिवराय आणि तुकोबारायांचा जयघोष त्यांच्या समर्थकांनी केला. मावळचा वाघ आला,अशा घोषणाही त्यांनी दिल्या.

भेगडे यांच्यारुपाने २१ वर्षानंतर मावळला राज्यात मंत्रीपद मिळाले आहे. एका एकनिष्ठ कार्यकर्त्याला भाजपने संधी दिली आहे. त्यातून त्यांचे आमदारकीची हँटट्रिक करण्याचे चान्सेसही वाढले आहेत. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेला त्यांचे तिकीट जवळपास नक्की झाले आहे. तसे झाले आणि भेगडे निवडून आले तर मावळात इतिहास होणार आहे कारण आतापर्यंत मावळमध्ये कोणाचीही हँटट्रिक झालेली नाही.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील कँबिनेटमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे लोकसभेला निवडून गेल्याने त्यांनी मंत्रीपद व आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तर, जिल्ह्यातील सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांचा आज राजीनामा घेण्यात आला.त्यामुळे जिल्ह्यातून फक्त भेगडे एकमेव मंत्री राहिले आहेत. बापट व कांबळे पुणे शहरातील होते तर, भेगडे यांच्या रुपाने जिल्ह्यातील ग्रामीण भागाला आता मंत्रीपद मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com