parner bajar samiti politics | Sarkarnama

प्रशांत गायकवाडांना हटविण्यासाठी संचालक मांडओहळ धरणावर भेटले! 

मार्तंड बुचुडे 
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

निवडीच्या वेळीच राजीनामा घेतल्याचे झावरे यांनी म्हटले आहे.

पारनेर (जि. नगर) : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांना हटविण्याच्या मोहीमेला सुरूवात झाली आहे. बाजार समितीच्या संचालकांची बैठक मांडओहळ धरणावर झाली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुजीत झावरे व तालुका अध्यक्ष दादासाहेब पठारे, राहुल शिंदे व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संभाजी रोहकले यावेळी उपस्थित होते. बाजार समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. 

सुमारे दोन वर्षीपूर्वी निवडणूक झाली. या वेळी दोन्ही कॉंग्रेसने एकत्र निवडणूक लढवली होती. विजयानंतर सर्वानुमते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गायकवाड सभापती, तर कॉंग्रेसचे विलास झावरे यांना उपसभापती करण्यात आले. सध्या तालुक्‍यातील दोनही कॉंग्रेसमध्ये उघड उघड गटबाजी आहे.

नुकतीच सुपे येथे सुजीत झावरे यांच्या विरोधातील नाराज व कॉंग्रेसच्या एका गटाची बैठक झाली. या बैठकीस गायकवाड यांची उपस्थिती होती. त्याच पार्श्वभूमिवर सुजित झावरे यांनी ही बैठक बोलवली होती, अशी चर्चा आता रंगली आहे. या बैठकीत त्यांचे 10 पैकी आठ संचालक उपस्थीत होते. गायकवाड व अण्णा बढे हे गैरहजर राहिले. या वेळी सर्वांनीच आम्हाला संधी मिळावी व गायकवाड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केल्याचे समजते. मात्र कॉंग्रेसला या राजकारणात रस नाही, तुम्हाला अध्यक्ष बदल करावयाचा असेल तर तो तुमचा प्रश्न आहे, आम्ही आमचा उपाध्यक्ष कायम ठेऊ, असे सांगतले व जर अविश्वासाचा ठराव आणला, तर आम्ही तटस्थ राहू, असे सांगितल्याचे समजते. 

सर्वच संचालकांनी गायकवाड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे, म्हणजे आम्हाला संधी मिळेल, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच निवडीच्या वेळीच प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून सभापतीपदाची निवड एक वर्षासाठी ठरली आहे. मी निवडीच्या वेळीच सभपती व उपसभापती यांचे राजीनामे लिहून घेतले आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा म्हणजे पक्षाची विश्वासार्हता वाढेल व आम्ही शब्द पाळतो, हे जनतेला कळेल. आम्ही दोन दिवस वाट पहाणार आहोत, नाहीतर नंतर निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादी  सुजीत झावरे यांनी सांगितले. 

संबंधित लेख