parliament session starts from 11 december | Sarkarnama

संसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. 

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबर ते आठ जानेवारी 2019 असे होईल. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हे अखेरचे अधिवेशन असून तोंडी तलाक विधेयक संमतीचा सरकारचा प्रयत्न राहील, तर 'राफेल' प्रकरण, सीबीआयमधील वाद यावरून सरकारला घेरण्यासाठीचा दारूगोळा विरोधकांनी जमा केला असल्याने हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. 

संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांच्या निधनानंतर या खात्याची जबाबदारी ग्रामविकासमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे काल सोपविण्यात आली. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज विषयक समितीची बैठकही काल झाली होती. त्यानंतर संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी आज अधिवेशनाचे वेळापत्रक जाहीर केले. महिनाभर चालणाऱ्या या अधिवेशनात 20 बैठकांमध्ये मुस्लिम महिलांच्या अधिकारांशी संबंधित तोंडी तलाक विधेयक संमत करण्याचा सरकारचा प्रामुख्याने प्रयत्न राहील. तसेच भारतीय मेडिकल परिषदेसह अन्य विधेयके सभागृहापुढे मांडली जातील. 

सर्वसाधारणपणे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरवात आणि सांगता डिसेंबरमध्येच होते. परंतु राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोरम या पाच विधानसभा निवडणुकांमुळे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आल्याचा युक्तिवाद केला जात आहे. मात्र 'राफेल' प्रकरणात विरोधकांकडून दररोज होणारे आरोप, सीबीआयमधील अंतर्गत भांडण चव्हाट्यावर आल्यानंतर सरकारची झालेली नाचक्की, इंधन दरवाढीचा मुद्दा तसेच आर्थिक आघाडीवरील सरकारचे अपयश हे मुद्दे सभागृहात उपस्थित करून संसदेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार करण्याची विरोधकांना संधी मिळू नये, हा सत्ताधारी भाजपचा प्रयत्न होता. त्यामुळे अधिवेशन उशिरा होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.  

संबंधित लेख