parbhani-suresh-varpudkar-babajani-durani | Sarkarnama

वरपुडकर-बाबाजानींचा एकोपा वरपुडकर समर्थकांना आवडेना

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकी कॉग्रेस - राष्ट्रवादी कॉग्रेसची आघाडी होणार हे आता निश्चित समजले जात आहे. परंतू पाथरी विधानसभा मतदारसंघात सध्या सुरेश वरपुडकर - बाबाजानी दुर्राणी यांच्यातील आघाडीची चर्चा रंगू लागली आहे. 

परभणी : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकी कॉग्रेस - राष्ट्रवादी कॉग्रेसची आघाडी होणार हे आता निश्चित समजले जात आहे. परंतू पाथरी विधानसभा मतदारसंघात सध्या सुरेश वरपुडकर - बाबाजानी दुर्राणी यांच्यातील आघाडीची चर्चा रंगू लागली आहे. 

हा मतदार संघ कॉग्रेसला सोडण्यापासून ते वरपुडकरांच्या विजया पर्यंतच्या हालचाली सुरु आहेत. परंतू या दोघांच्या मनोमिलनामुळे पाथरी मतदार संघातील वरपुडकर गटातील प्रमुख कार्यकर्ते नाराज दिसत आहेत. त्यामुळे बाबाजानींचा शब्द जरी आला असला तरी वरपुडकरांना विजयासाठी स्वत:ची यंत्रणाही वापरावी लागणार आहे.

दिग्गजांच्या पाथरी विधानसभा मतदार संघात इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या मतदार संघात माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांना निवडून आणण्यासाठी आमदार बाबाजानी दुर्राणी प्रयत्नात आहेत. त्यामुळे वरपुडकरांची भिस्त ही आमदार दुर्राणींच्या खांद्यावरच आहे. 

राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी वरपुडकरांना विजयाचा शब्द दिला आहे. वरपुडकरांसाठी दुर्राणी ही जागा कॉग्रेसला सोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे. तर त्या बदल्यात दुर्राणी परभणीच्या जागेवर हक्क सांगू शकतात. वरपुडकरांनी गेल्या वर्षभरापासून या मतदार संघात मतदारांच्या गाठी भेटी घेणे सुरु केले आहे. त्यांच्या सुनबाई प्रेरणा वरपुडकर यांनी आरोग्य शिबीराच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविला आहे. दुसरीकडे बाबाजानी दुर्राणीचा हा गढ असला तरी त्यांच्या विरोधात देखील या मतदार संघात मतदान झाल्याचे आजपर्यतचे आकडे सांगतात.

वरपुडकरांना मानणारा वर्ग या मतदार संघात आहे. परंतू तो वर्ग बाबाजानींचा विरोधक आहे. त्यामुळे वरपुडकर समर्थकांना वरपुडकर - दुर्राणी यांची जवळीक खटकत आहे.
 

संबंधित लेख