परभणीत पालकमंत्र्यांसमोर खासदार-आमदारांच्या मनोमिलनाचे आव्हान

मागील वर्षी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी आलेले तत्कालीन पालकमंत्री दिवाकर रावते आणि खासदार संजय जाधव यांच्यात जाहीर खटके उडाले होते. हस्तांदोलनासाठी रावते यांनी पुढे केलेला हात देखील जाधव यांनी झिडकारल्याचे बोलले जाते. याशिवाय गणेशोत्सवाच्या काळात राहूल पाटील आणि संजय जाधव यांच्यात भडका उडाला होता.
परभणीत पालकमंत्र्यांसमोर खासदार-आमदारांच्या मनोमिलनाचे आव्हान

परभणी : मराठवाड्यात शिवसेनेची भक्कम पाळेमुळे कुठे रूजली असतील तर ती औरंगाबाद नंतर परभणी जिल्ह्यातच. स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका व विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी परभणी लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे. 

सध्या जिल्ह्यात खासदार संजय जाधव विरुद्ध आमदार राहुल पाटील असा संघर्ष उडालेला आहे. यापूर्वीचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी या संघर्षाला पुर्णविराम देण्याऐवजी तो भडकलेलाच कसा राहील याचे प्रयत्न त्यांच्या काळात केल्याचा आरोप केला जातोय. खासदार-आमदार या दोन विरुध्द टोकांना एकत्रित आणण्याचे शिवधनुष्य नवे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पेलावे लागणार आहे. 

1989 पासून 2014 पर्यंत 98 चा अपवाद वगळता परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार विजयी झालेला आहे. एकीकडे लोकसभा मतदारसंघात शिवसेना सातत्याने विजय मिळवत असली तरी या शहराला पक्षफुटीचा काळा इतिहास देखील आहे. अशोक देशमुख, सुरेश जाधव यांनी प्रत्येकी दोनवेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. 98 मध्ये कॉंग्रेसचे सुरेश वरपूडकर विजयी झाले होते. त्यानंतर पुन्हा तुकाराम रेंगे पाटलांनी विजय मिळवत हा मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून आणला. 

या शिवाय जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघा पैकी केवळ परभणीत राहुल पाटील यांच्या रुपाने शिवसेनेला 2014 च्या निवडणूकीत यश मिळाले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन तर भाजपचा एक आमदार आहे. परभणी महापालिकेत देखील कॉंग्रेसची सत्ता आहे. 

दिवाकर रावते पालकमंत्री असतांना जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात उफाळून आली होती. खासदार संजय (बंडू) जाधव आणि आमदार राहूल पाटील असे सरळ सरळ दोन गट जिल्ह्यात पडले. ही गटबाजी मोडून काढण्याऐवजी रावते यांनी राहूल पाटील यांना बळ दिल्याचे बोलले जाते. 

परिणामी जाधव-पाटील यांच्यातील मतभेद टोकाला गेले आणि त्याचा फटका पक्षाला बसला. खासदार संजय जाधव यांचे पालकमंत्री रावते आणि आमदार राहूल पाटील यांच्याशी पटत नसल्याने त्याचा परिणाम कार्यकर्ते विखुरण्यावर झाला. फटकळ स्वाभावामुळे खासदार जाधव यांचे अनेक समर्थक राहूल पाटील यांच्या गोटात शिरले आहेत. 

मागील वर्षी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी आलेले तत्कालीन पालकमंत्री दिवाकर रावते आणि खासदार संजय जाधव यांच्यात जाहीर खटके उडाले होते. हस्तांदोलनासाठी रावते यांनी पुढे केलेला हात देखील जाधव यांनी झिडकारल्याचे बोलले जाते. याशिवाय गणेशोत्सवाच्या काळात राहूल पाटील आणि संजय जाधव यांच्यात भडका उडाला होता. 

खासदार जाधव आणि आमदार राहूल पाटील यांच्यातील हा संघर्ष थेट मातोश्रीवर पोहचला होता. त्यावर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दोघांचीही समजूत काढून त्यांना संघटना वाढीसाठी काम करण्याचे आदेश दिले होते. पण मातोश्रीची पायरी उतरताच पुन्हा दोघे आपापल्या मार्गानेच निघाल्याचे सद्यस्थितीवरून स्पष्ट होते. नवे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर आता या दोन नेत्यांचे मनोमिलन घडवून पक्षाची ताकद वाढवण्याचे आव्हान असणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com