Parbhani NCP names for loksabha Vijay Bhamble & Rajesh Vitekar | Sarkarnama

परभणीत राष्ट्रवादीच्या चाचपणीत  विजय भांबळे व राजेश विटेकर यांची नावे 

गणेश पांडे
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

मी इच्छुकच नाही : आमदार विजय भांबळे
परभणी लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी उमेदवार म्हणून माझे नाव सुचविले. परंतू मी स्वतः  या निवडणुकीसाठी इच्छुक नाही असे आपण पक्षाध्यांना सांगितले आहे अशी प्रतिक्रिया आमदार विजय भांबळे यांनी दिली.

परभणी:  परभणी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसकडून आमदार विजय भांबळे व राजेश विटेकर यांची नावे समोर आली. मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.सहा) झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांनी या दोन नेत्यांच्याच नावाला पसंती दिली आहे.

परभणी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसकडून इच्छुकासह जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे शनिवारी (ता.सहा) सायंकाळी सहा वाजता पार पडली.

या बैठकीत परभणी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे, आमदार विजय भांबळे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा भावना नखाते, माजी खासदार अॅड.सुरेश जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी खासदार अॅड.गणेशराव दुधगावकर, परभणीचे माजी महापौर प्रताप देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार आदीसह महत्वाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी परभणीच्या जागेसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर, माजी खासदार अॅड. सुरेश जाधव, राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडीच्या सोनाली देशमुख यांची नावे इच्छुकांमध्ये होती.

पंरतू  जिल्हाध्यक्ष या नात्याने आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जिंतूरचे आमदार विजय भांबळे व राजेश विटेकर हे दोघे या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून योग्य असल्याचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना सुचविले.

परभणी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या यादीमध्ये माजी खासदार अॅड. सुरेश जाधव यांचे ही नाव आहे. पंरतू सक्षम उमेदवारामध्ये जिल्हाध्यक्षांनी त्यांचे नाव न घेतल्याने सुरेशराव नाराज झाले. त्यांनी त्यांची नाराजी याच बैठकीत बोलून दाखविली असल्याचे समजते . 

खान  - बाण साठी मुस्लिम उमेदवार नकोच..!
परभणी लोकसभा मतदार संघात साडेचार लाख मुस्लिम उमेदवार आहेत. त्याच बरोबर आज पर्यत परभणी विधानसभा व घनसावंगी विधानसभेतील मतदानाचा विचार केला तर या ठिकाणी राष्ट्रवादी कॉग्रेसला मताधिक्य मिळालेले आहे.

त्यामुळे या ठिकाणी मुस्लिम उमेदवार देण्याच विचार पक्षाने करावा असी भुमिका माजी महापौर प्रताप देशमुख यांनी मांडली . पंरतू त्याला विरोध करत खान  - बाण न होऊ देण्यासाठी मुस्लिम उमेदवारच नको असे ही या बैठकीत परभणीच्या नेत्यांनी  सांगितले.

 

संबंधित लेख