परभणीत शिवसेनेच्या खासदार - आमदारातील संघर्षाला निमित्त मेडिकल कॉलेजचे !
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आता आंदोलनाचा तिसरा टप्पा जिल्हयातील महिलांचे घेराव आंदोलन असणार आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता हजारो महिला जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालण्यासाठी आंदोलनात सहभागी होतील .
-खासदार संजय जाधव
परभणी: परभणी जिल्ह्यात शिवसेनेचे अंतर्गत मतभेद सामोपचाराने मिटवले नाहीत गृहयुध्हाचा केंव्हाही भडका उडेल अशी चिन्हे आहेत . परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव आणि परभणीचे आमदार डॉ . राहुल पाटील यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही . आता या दोघातील वादाला वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीचा तडका मिळाला आहे .
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजूरी मिळावी यासाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. तीन सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय धरणे आंदोलन झाले. त्या पाठोपाठ 11 सप्टेंबर रोजी विद्यार्थांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या आंदोलनाने अधिकच धार घेतली. खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या धरणे आंदोलनाकडे व विद्यार्थांच्या मोर्चाकडे जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी पाठ फिरविली होती.
त्यामुळे या मागणीसाठी आमदारांची भूमिका काय ? असा प्रश्न सर्वसामान्य परभणीकरांना पडला होता. परंतू अचानक मंगळवारी (19) परभणीचे आमदार डॉ. राहूल पाटील, पाथरीचे आमदार मोहन फड, जिंतूर - सेलूचे आमदार विजय भांबळे व गंगाखेडचे आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी आमदार अॅड.विजयराव गव्हाणे यांच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान परभणी जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावे अशी मागणी केली.
शिवसेनेचे आमदार असूनही डॉ . राहुल पाटील स्वपक्षीय खासदारांच्या आंदोलनात सहभागी झाले नाहीत आणि याच प्रश्नावर मुख्यमंत्र्यांकडे गेले . बर आमदार गेले तर एकटे नाही गेले ! जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांना झाडून सोबत घेऊन गेले ;पण खासदार संजय जाधव यांना साधे निमंत्रण देखील दिले नाही . खासदार संजय जाधव यामुळे संतापलेले दिसत आहेत .
खासदार संजय जाधव यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार मंडळींना टोला लगावला . ते म्हणले ,"शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी आपण स्वत: पुढाकार घेऊन जिल्ह्यातील सर्व आमदारांना आंदोलनात सहभागी व्हा असा सांगावा धाडला होता. पंरतू तेव्हा ते आले नाहीत. आता जिल्ह्यातील सर्व आमदारांनी याच मागणीसाठी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्र्याची भेट घेतली. उशिरा का होईना ते सर्व आले ही आनंदाची गोष्ट आहे. आपण त्यांचे स्वागत करतो, परंतू त्यांच्या निवेदनात विद्यार्थांच्या आंदोलनाचा साधा उल्लेख ही नाही ही खंत वाटते . "
खासदार संजय जाधव पुढे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना निवेदन देतांना आपल्याला बोलावण्यातच आले नाही. जेव्हा त्यांच्या निवेदनाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले तेव्हाच मला कळाले. त्या दिवशी मी सुध्दा मुंबईत लालबागच्या गणपतीच्या दर्शनासाठी गेलेलो होतो. परंतू असो मला बोलावणे महत्वाचे नाही. ज्या मागणीसाठी परभणीकरा एकवटले आहेत, त्या मागणीसाठी सर्व लोकप्रतिनिधी एकवटले ही अभिमानाची बाब आहे. उशिरा का होईना जिल्ह्यातील सर्व आमदारांनी या प्रश्नावर आवाज उठवला ही चांगली गोष्ट आहे. परंतू मुख्यमंत्र्यांना जे निवेदन दिले. त्या निवेदनात कुठेही 11 सप्टेंबर रोजी विद्यार्थांनी केलेल्या भव्य आंदोलनाचा पुसटसा ही उल्लेख केलेले नाही याची आपल्याल खंत वाटते."
यावेळी जिल्हा प्रमुख विशाल कदम व विधानसभा प्रमुख माणिक पोंढे पाटील यांची उपस्थिती होती.