परभणी शहर व जिल्ह्यात आंदोलन चिघळले, पोलिसांकडून हवेत गोळीबार

 परभणी शहर व जिल्ह्यात आंदोलन चिघळले, पोलिसांकडून हवेत गोळीबार

परभणी : मराठा आरक्षणाचे आंदोलन शहरासह जिल्ह्यात अधिकच चिघळले असून सलग तिसऱ्या दिवशीही परभणी शहरासह जिल्ह्यात शनिवारी (ता.28) दडगफेकीच्या घटना घडल्या. टाकळी कुंभकर्ण येथे जमावाने केलेल्या हल्ल्यात आठ पोलिस कर्मचारी जबर जखमी झाले. या जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. वसमत रस्त्यावर जमावाने जाळपोळ करत काही पेट्रोलपंपावर दगडफेक करत तोडफोड केली. यामुळे परभणी - वसमत रस्ता दुपारी 12 वाजल्यापासून ते सायंकाळ पर्यत वाहतुकीसाठी बंद होता. पूर्णा तालुक्‍यात आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन केले. पाथरी व सेलूत चक्का जाम आंदोलनात महिलांनीही सहभाग घेतला. मानवत येथे ही तुफान दगडफेक करण्यात आली. 


परभणी शहरात गुरुवारी मराठा समाजाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. परंतू त्याचवेळी शहरात तुफान दगडफेकीच्या घटना घडल्याने पोलिसांना जमावाला शांत करण्यासाठी सोम्य लाठीहल्ला करावा लागला होता. यावेळी जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत तीन पोलिस कर्मचारी व आंदोलणातील काही युवक जबर जखमी झाले होते. त्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (ता.29) जिल्हाभरात चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्याप्रमाणे परभणी जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

परभणी शहरातील वसमतरस्ता व पाथरी रस्त्यावरील विसावा फाटा येथे सकाळी नऊ वाजल्यापासून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शहरातील वसमत रस्त्यावरील दोन पेट्रोलपंपासह अनेक दुकानावर जमावाने प्रचंड दगडफेक केली. यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दुपारी 12 वाजल्यापासून ते सायंकाळ पर्यत हा रस्ता वाहतुकीस बंद होता. मोठे मोठे दगड या रस्त्यावर टाकण्यात आले होते. टायर जाळल्याने या भागात तणाव वाढला होता. पूर्णेत सकाळपासूनच सर्व शैक्षणिक संस्था व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. 

या तालुक्‍यातील गौर, माटेगाव आदी ठिकाणी चक्काजाम करण्यात आला.. मानवत शहर बंदचीहाक देण्यात आली. तेथे जमावाने शहरात प्रचंड दगडेफेक केली. धानोरा काळे (ता.पूर्णा) येथे गोदावरी नदीवरील डिग्रस बंधाऱ्यात आंदोलनकर्त्यांनी उड्या घेतल्याने पोलिसांची दमछाक झाली. पोलिसांनी या ठिकाणी बचाव पथके तैनात केली. जिंतूर तालुक्‍यातील चारठाणा येथे जिंतूर - औरंगाबाद महामार्गावर रस्तारोको सुरु कऱण्यात आले. ताडकळस भागात अनेक रस्त्यावर मोठी -मोठी झाडे तोडून आडवी टाकून रस्ते बंद करण्यात आले होते. 

पोलिसांच्या गाडीवर हल्ला, आठ पोलिस जखमी 
धर्मापूरी (ता.परभणी) येथील रस्ता मोकळा करून पुढे टाकळी कुंभकर्ण (ता.परभणी) येथे जाणाऱ्या ग्रामीण पोलिसांच्या गाडीला टाकळी कुंभकर्ण शिवारात मोठ्या जमावाने अडविले. पोलिसांना खाली उतरूवून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. जमावाने लाठ्या - काठ्या व दगडाचा वापर करून पोलिसांवर हल्ला केला. यात ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडाळकर यांच्यासह फौजदार उदय सावंत, पोलिस कर्मचारी जनार्दन चाटे, राजकुमार बचाटे, ज्ञानेश्वर निंबाळकर, साईनाथ मिठेवाड, सुरेश सुरनर, योगेश सानप हे आठ कर्मचारी - अधिकारी जमावाच्या हल्ल्यात जबर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या पैकी योगेश सानप व जनार्दन चाटे यांना जोरदार मारहाण झाली आहे. 

एसआरपीएफ कडून हवेत गोळीबार 
टाकळी कुंभकर्ण येथे ग्रामीण पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी टाकळी कुंभकर्ण येथे गेली होती. परंतू जमावाने या गाडीला घेरण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला जमावाला शांत कऱण्यासाठी एसआरपीएफचे जवान खाली उतरले परंतू जमाव अंगावर चालून आल्याने पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी हवेत दोन राऊंड फायर केले अशी माहिती पोलिस अधिक्षक दिलीप झळके यांनी दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com