parbhani-corporation-shivsena-agitation | Sarkarnama

परभणी महापालिकेच्या विरोधात शिवसेनेने पेटविले अग्नीकुंड

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, अस्वच्छता, दुषित पाणी आदींसह विविध समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या शहर शाखेने आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (28) शहराच्या विविध भागात आंदोलने केली. कुठे खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून तर कुठे अग्नीकुंड पेटवून महापालिकेच्या कारभाराचा तीव्र निषेध केला. 

परभणी : शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, अस्वच्छता, दुषित पाणी आदींसह विविध समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या शहर शाखेने आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (28) शहराच्या विविध भागात आंदोलने केली. कुठे खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून तर कुठे अग्नीकुंड पेटवून महापालिकेच्या कारभाराचा तीव्र निषेध केला. 

शिवसेनेच्या वतीने शहरातील मुख्य रस्ते, वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था व त्यामुळे नागरीकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन मंगळवारी शहराच्या विविध भागात आंदोलने छेडली. कारेगाव रस्त्यावर जायकवाडी वसाहतीसमोर मोठा खड्डा पडलेला असून त्यामध्ये पाणी साचलेले आहे. आमदार डॉ. पाटील यांनी त्या खड्ड्यामध्ये बेशरमाचे झाड लावून महापालिकेचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी परिसरातील नागरीक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अशीच काहीशी परिस्थिती जुना पेडगाव रस्त्याची झाली आहे. या रस्त्यावर देखील खड्ड्यामुळे सातत्याने पाणी साचलेले असते. त्या ठिकाणी देखील बेशरमाची झाडे लावून पालिकेच्या कारभाराची लक्तरे काढली. 

शहरातून बसस्थानकाकडे डॉक्टरलेनमधून जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. पाऊस पडला तर रस्ता अधिकच धोकादायक होता. महापालिकेने या रस्त्याचे काम तात्काळ करण्याची सुबुध्दी मिळावी म्हणून या ठिकाणी शिवसेनेने महायज्ञ केला. आमदार डॉ. पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरीक सहभागी झाले होते. 

शिवसेनेच्या ठिकठिकाणच्या आंदोलनात सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, माजी उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, तालुका प्रमुख नंदु अवचार, पालिकेतील शिवसेनेचे गटनेते चंद्रकांत शिंदे, नगरसेवक सुशिल कांबळे, माजी विरोधी पक्ष नेत्या अंबिका डहाळे, अनिल डहाळे, बाळराजे तळेकर, नवनित पाचपोर, उध्दव मोहिते, विश्वास कऱ्हाळे, राहुल खटींग, अमोल वाघमारे, दिलीप गिराम, संभानाथ काळे, मकरंद कुलकर्णी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाली होते. 

आंदोलनानंतर शिवसेनेचे पालिकेचे आयुक्त रमेश पवार यांची भेट घेऊन शहराच्या दुरावस्थेचा जाब विचारल्याची माहिती सुत्रांनी दिली. येत्या पंधरादिवसात समस्या मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील शिवसेनेने दिला. नळाचे पाणी पिण्याचा आग्रह देखील आयुक्तांना करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

संबंधित लेख