paras kendra akola | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

पारस वीज प्रकल्पाच्या मुद्यावर भाजप-शिवसंग्राममध्ये कुरघोडीचे राजकारण

श्रीकांत पाचकवडे
मंगळवार, 18 जुलै 2017

अकोला : पारस वीज प्रकल्पाच्या विस्तारीकरणाच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजप आणि महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसंग्राममध्ये कुरघोडीचे राजकारण तापले आहे. ऊर्जा मंत्र्यांनी पारस औष्णिक वीज प्रकल्पात 660 मेगावॉटचा विस्तारीत प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनीच आता येथे औष्णिक विज निर्मिती ऐवजी 25 मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मुद्दा पुढे आल्याने या प्रकल्पावरून परिसरातील शेतकऱ्यांसह शिवसंग्रामने आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. 

अकोला : पारस वीज प्रकल्पाच्या विस्तारीकरणाच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजप आणि महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसंग्राममध्ये कुरघोडीचे राजकारण तापले आहे. ऊर्जा मंत्र्यांनी पारस औष्णिक वीज प्रकल्पात 660 मेगावॉटचा विस्तारीत प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनीच आता येथे औष्णिक विज निर्मिती ऐवजी 25 मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मुद्दा पुढे आल्याने या प्रकल्पावरून परिसरातील शेतकऱ्यांसह शिवसंग्रामने आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. 

पारस औष्णिक वीज प्रकल्पात 660 मेगावॉट विस्तारीत प्रकल्प सुरू करण्याच्या मागणीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ऊर्जामंत्र्यांनी आधी हा प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली. मात्र, त्यानंतर आता 25 मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचा मुद्दा पुढे आल्याने तालुक्‍यातील जनतेकडून त्याला विरोध होत आहे. या प्रकल्पात 660 मेगावॉट विस्तारीकरणाला भाजपच्या स्थानिक नेत्यांचा छुपा विरोध असल्याचे बोलले जात आहे. मात्र, प्रकल्प उभारणीवरून परिसरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात शिवसंग्रामने उडी घेतल्याने गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसंग्राम रंगलेला वाद पुन्हा उफाळून आला आहे. 

विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत महायुतीचा घटकपक्ष म्हणून शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांना बाळापूर मतदार संघातून उमेदवारी मिळाली होती. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिवसंग्रामची उमेदवारी झुगारून भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांना पक्षाकडून एबी फॉर्म देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. या निवडणुकीत संदीप पाटील यांनी भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांना जोरदार टक्कर दिली होती. मात्र, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या म्हणी प्रमाणे भारिप बमसंचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी भाजप आणि शिवसंग्रामच्या उमेदवारांचा पराभव करीत मतदार संघ ताब्यात ठेवला. 

शिवसंग्रामच्या उमेदवारीमुळे भाजप जिल्हाध्यक्षाला पराभवाचे तोंड पहावे लागले, याची सल भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या मनात अजूनही कायम आहे. तर आपल्याला महायुतीकडून जागा मिळाल्यावर भाजपच्या नेत्यांनी विश्वासघात केला, याचा राग शिवसंग्रामच्या नेत्यांमध्ये घुसमटत आहे. त्यातूनच काही वर्षांपासून भाजप विरुद्ध शिवसंग्राम असे राजकीय शितयुद्ध सुरू आहे. गत आठवड्यात शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती होवो अथवा नाही पण बाळापूर मतदार संघातून शिवसंग्राम लढणार असल्याची सिंहगर्जना केली. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून आतापासूनच बाळापूर विधानसभेच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. 

पारस वीज प्रकल्पाच्या विस्तारीकरणाच्या मुद्याला त्यातूनच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पारस औष्णिक विद्युत केंद्राच्या निर्मितीच्या सुरूवातीच्या कामाचे कंत्राट संदीप पाटील यांना मिळाले होते. त्यामाध्यमातून पाटील आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले होते. आता तर नागपूर मेट्रो रेल्वेचे काम करीत असलेल्या कंपनीशी पाटील संबंधित असल्याचे बोलले जात असून पारस येथे मेगावॉट प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यास त्याचे कामही पाटील यांना मिळून ते अधिक आर्थिकृदृष्ट्या सक्षम होऊन आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला डोईजड होणार असल्याने या प्रकल्पाला विरोध होत असल्याची चर्चा सुरू आहे. 
 

संबंधित लेख