parali nagarpalika | Sarkarnama

दारू विक्रेत्यांसाठी परळी पालिका धावली ! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मे 2017

आता या अवर्गीकृत रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची हमी नगर पालिकेने घेतली आहे. परळी शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अगोदरच वाईट असताना पालिकेने आणखी 5.90 किलोमीटरचा बोजा स्वतःच्या माथी केवळ केवळ दारू दुकानदारांचेच हित जोपासण्यासाठी मारून घेतल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यामंधून उमटत आहेत. 

बीड : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळी नगरपालिकेने शहर व परिसरातून जाणारे दोन राज्य रस्ते नगरपालिकेकडे हस्तांतरित करून दारू विक्रेत्यांना तातडीची मदत केली आहे. विशेष म्हणजे सरकारने देखील या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देत 5.90 किलोमीटरचा या दोन्ही रस्त्यांचा राज्यमार्ग दर्जा काढून टाकत अवर्गीकृत केले आहे. 

रस्ते अपघातांच्या प्रमाणाचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य मार्गाच्या 500 मीटर परिसरातील दारू दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बार आणि परमीट रूम बंद झाल्या आहेत. परंतु यावर रस्त्यांचा दर्जा कमी करून ते महापालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्ग करण्याची शक्कल लढविण्यात आली. सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी काही ठिकाणी या निर्णयाला अनुकूल दिसले. महापालिका या शर्यतीत पुढे असतानाच राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांची सत्ता असलेल्या परळी नगरपालिकेने देखील दारू विक्रेत्यांना वाचवण्यासाठी पाऊल उचलले. 

परळी पालिकेने दिलेल्या प्रस्तावानुसार व अधीक्षक अभियंत्यांच्या अहवालाच्या आधारे राज्य सरकारने परळी परिसरातून जाणारे खर्डा - परळी (राज्य मार्ग क्र. 64 ) व खामगाव -बर्दापूर ( राज्य मार्ग क्र . 221 ) या दोन रस्त्यांची परळी शहर परिसरातील अनुक्रमे 4.40 आणि 1.50 किलोमीटरची साखळी अवर्गीकृत करून त्यांचा राज्यमार्गाचा दर्जा काढला आहे. 

 

संबंधित लेख