Paraksh Mehta's fate will be sealed in Delhi | Sarkarnama

प्रकाश मेहतांची आता अग्निपरिक्षा : राजीनाम्याबाबत दिल्लीतून निर्णय होणार?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

माझ्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत. मी राजीनामा द्यायला तयार आहे परंतु, त्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रीय पक्षाध्यक्ष अमित शाह हे घेतील- प्रकाश महेता

मुंबई : गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या राजिनाम्याच्या मागणीसाठी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक झाले असताना, महेता यांना वाचवायचे की, मंत्रीपदाचा राजीनामा घ्यायचा? हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हातात नसून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या दरबारी महेता प्रकरण गेले आहे. विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी, दिल्लीतून निर्णय होत नाही तोपर्यंत प्रकाश महेता यांच्याबाबत कोणताही निर्णय मुख्यमंत्री घेणार नसल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

पावसाळी अधिवेशनात भाजप सरकारची कोंडी करण्यासाठी पहिल्या दिवसापासून काँग्रेस राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी प्रकाश मेहता यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर राळ उठविली आहे. महेता प्रकरणावरुन सभागृह बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एका महिन्यात चौकशी केली जाईल असे आश्‍वासन दिले असले तरी, विरोधकांचे समाधान झालेले नाही. मुंबईतील घाटकोपर विधान सभा मतदारसंघातून सहा वेळा निवडून येवून गेले 27 वर्षे प्रतिनिधीत्व करणारे प्रकाश महेता हे गुजराती आणि मारवाडी समाजात लोकप्रिय आहेत.

मुळचे गुजरातचे असलेल्या महेता यांचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. मुंबईचे अध्यक्ष म्हणून यापुर्वी काम केलेल्या महेता यांचे भाजपातील ज्येष्ठ नेत्यांशी घरोब्याचे संबंध आहेत. त्यामुळे महेता यांच्या सारख्या ज्येष्ठ मंत्र्यांचा राजीनामा घेणे ही मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने सहज सोपी गोष्ट नाही.

दरम्यान, भाजप राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी शनिवारी मुंबई भेटीत प्रकाश महेता प्रकरण समजून घेतले आहे. त्यासंबंधीचा अहवाल पांडे यांनी अमित शाह यांना दिला आहे. पांडे यांच्या अहवालानंतर अमित शाह हे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. परंतु, मंगळवारी पुन्हा अधिवेशन सुरु होताना प्रकाश महेता यांच्या राजीनाम्यांच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक होण्याची शक्‍यता आहे.

माझ्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत. मी राजीनामा द्यायला तयार आहे परंतु, त्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रीय पक्षाध्यक्ष अमित शाह हे घेतील, अशी प्रतिक्रिया प्रकाश महेता यांनी दिली आहे. त्यामुळे महेता यांच्याबाबतच्या निर्णयाचा चेंडू आता दिल्लीच्या कोर्टात असल्याचे दिसून येत आहे.

 

संबंधित लेख