परभणीत उमेदवारांची गर्दी, उद्या चित्र स्पष्ट होईल

परभणीत उमेदवारांची गर्दी, उद्या चित्र स्पष्ट होईल

परभणी, ता. 3 ः महापालिका निवडणुकीसाठी बहुतांश पक्षांच्या उमेदवारी याद्या अद्यापही निश्‍चित झाल्याचे दिसून येत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची (सोमवार) अंतिम तारीख असून अर्ज सादर करण्यासाठी दंगल उसळण्याची शक्‍यता आहे. महापालिकेच्या निवडणुकीत प्रमुख पक्षांसह "एमआयएम' आणि बसप देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे यंदा चुरस वाढणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी 27 मार्चपासून अर्ज स्वीकारण्यास सुरवात झाली असली तरी 31 पर्यंत केवळ पंधरा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत चार प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह छोटे - मोठे पक्ष व अपक्ष असे तीनशेपेक्षा अधिक उमेदवार उभे राहण्याची शक्‍यता आहे. 
उमेदवार निश्‍चितीचे पक्षांचे गुऱ्हाळ सुरूच 
महापालिका निवडणुकीत अद्याप एकाही पक्षाने आपले उमेदवार अधिकृतरीत्या जाहीर केले नाहीत. एक तर ते पक्ष अन्य पक्षांचे उमेदवार जाहीर होण्याची प्रतीक्षा करीत आहेत, दुसरे कारण म्हणजे त्यांना अनेक प्रभागांत उमेदवार सापडत नाहीत, तिसरे कारण असे आहे की काही प्रभागांत उमेदवारीवरून वाद निर्माण झाले आहेत. शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात काही जागांबाबत मोठे वाद सुरू असून काही पक्षात नेतेमंडळीतील शीतयुद्ध विलंबास कारण ठरत आहे. त्यामुळे त्या पक्षांचे अनेक इच्छुक उमेदवार कुंपणावरच असून त्यामध्ये काही नगरसेवकांचा देखील समावेश आहे. काही पक्षांतील भांडण थेट मुंबईपर्यंत पोचले असून नेतेमंडळी आपापल्या समर्थकांसह तेथे ठाण मांडून आहेत. ज्यांचे तिकीट फायनल आहे, अशा उमेदवारांना प्रचारास लागण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर काही पक्षांनी आपल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्याही सूचना केल्या आहेत. 
एमआयएम निवडणूक लढविणार 
महापालिका निवडणुकीच्या रिंगणात एमआयएम आपले उमेदवार उतरविणार आहे. मुस्लिम, दलित व उपेक्षित नागरिकांच्या विकासासाठी ही निवडणूक लढविणार असल्याची माहिती पक्षाचे महानगराध्यक्ष जाकेर कुरेशी यांनी दिली. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एमआयएम पक्षानेही भूमिका स्पष्ट केली. श्री. कुरेशी म्हणाले, परभणी शहरातील उपेक्षित, दलित व मुस्लिम नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले जाणार आहे. उपेक्षित लोकांच्या भावना समजून उमेदवार उभे केले जाणार आहेत. नव्या लोकांना संधी दिली जाणार आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक दिग्गज एमआयएमच्या संपर्कात आहेत. परभणी शहरातून इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे. त्यामुळे या वेळी निश्‍चित पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास आहे. प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असोद्दीन ओवेसी यांच्यासह अकबर ओवेसी यांच्या जाहीर सभा होणार आहेत. हैदराबादचे सात तर महाराष्ट्रातील दोन आमदार सलग नऊ दिवस शहरात राहतील असेही त्यांनी सांगितले. 
"बसप' स्वबळावर लढणार 
बहुजन समाज पक्ष महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी सुरेश साखरे यांनी जाहीर केले आहे. बहुजन समाज पक्षातर्फे महापालिका निवडणुकीतील उमेदवार निवडीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी प्रदेश प्रभारी प्रा. डॉ. ना. तु. कंदारे होते. या निवडणुकीसाठी मुख्य प्रचार प्रमुख म्हणून प्रा. विश्वनाथ मोडे यांची निवड करण्यात आली. परभणीचा महापौर हा पक्षाशिवाय होणार नाही, अशी अपेक्षा देखील श्री. साखरे यांनी या वेळी व्यक्त केली. 
बलाढ्य उमेदवारांना मैदान साफ 
महापालिकेच्या निवडणूक रणधुमाळी स्वतःचे नशीब अजमाविण्यासाठी प्रत्येक वॉर्डात इच्छुकांची संख्या मोठी आहे. परंतु या इच्छुकांच्या मनात प्रस्थापित व बलाढ्य उमेदवारांची धास्ती बसली आहे. या प्रस्थापित उमेदवारांना टक्कर देण्यासाठी नवेच काय परंतु राजकारणात मुरब्बी नेते मंडळी देखील धजावत नसल्याचे दिसून येत आहे. यंदाची ही निवडणूक सर्व पक्षांतील नेते मंडळींसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समाजकार्य करणाऱ्या प्रभागातील नेत्यांना आता महापालिकेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करावयाचा आहे. त्यामुळे शहरातील प्रभागांत इच्छुकांची संख्या मोठी आहे. गेल्या महिनाभरापासून हे इच्छुक कामाला लागले आहेत. परंतु ज्या प्रभागात प्रस्थापित आहेत. त्या प्रभागात त्यांच्याशी टक्कर घेण्यास कोणीही धजावत नाही. शहरातील अनेक प्रभागांत अशी परिस्थिती झाल्याने या बलाढ्य उमेदवारांच्या विजयाची पक्की खात्री दिली जात आहे. ज्या प्रभागात अशी मंडळी आपली उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशा प्रभागांत त्यांच्या प्रतिस्पर्धी पक्षांना डमी उमेदवार उभे करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अशा प्रभागात समझोता होत आहे. डमी उमेदवार उभा करून एका अर्थाने प्रस्थापित उमेदवारालाच निवडून आणण्याचे काम सर्वच पक्षाकडून होताना दिसत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com