कविता चौतमोल - डॉक्टर ते पनवेलच्या महापौर

दुष्काळी भागातून येत खडतर संघर्ष करत वाटचाल करणार्‍या डाॅ. कविता चौतमोल यांची वाटचाल महिलांसाठी खरोखरीच प्रेरणादायी आहे. आज पनवेल महानगरपालिकेच्या महापौर या नात्याने त्यांनी पहिल्याच दिवशी कामाची सूत्रे हाती घेतली. 'सरकारनामा'च्या वाचकांसाठी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या वाटचालीचा हा आढावा...
कविता चौतमोल - डॉक्टर ते पनवेलच्या महापौर

नवेल महानगरपालिकेच्या प्रथम महापौर बनण्याचा मान डॉ. कविता चौतमोल यांना मिळाला. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक विकसित व झपाट्याने नागरीकरण झालेला परिसर अशी या पनवेल परिसराची ओळख आहे. या शहरामध्ये देशाच्या कानाकोपर्‍यातून उपजिविकेसाठी तसेच शिक्षणासाठी आलेल्या लोकांचे निवासी वास्तव्य आहे. या शहरात सुशिक्षित टक्काही अधिक आहे. अशा शहराला प्रथम महापौर महिलेच्या माध्यमातून तेही उच्चविद्याविभूषित महिलेच्या माध्यमातून मिळाला आहे.

महाराष्ट्राच्या दुष्काळी भागापैकी मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन उच्च शिक्षण घेत डॉक्टर झालेल्या कविता चौतमोल ह्या पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम महापौर अर्थात मेयर म्हणून विराजमान झालेल्या आहेत. त्यांचा 'डॉक्टर ते मेयर' हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी असाच आहे. राजकीय कार्यकर्त्याशी विवाह आणि समाजसेवेची आवड असल्यामुळे राजकारणात येणे त्यातून नगरसेवक म्हणून निवडून येत महापौर या महत्वाच्या अधिकार पदावर काम करण्याची संधी मिळणे हा कांही योगायोग नसून त्यामागे कठोर परिश्रम आहेत, हे सुद्धा विसरता येणार नाही.

सिडकोने वसविलेल्या नवीन पनवेल येथील डॉ. कविता चौतमोल ह्या पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक म्हणून आजपासून कामकाज करणार आहेत . त्यानिमित्त त्यांच्या  शैक्षणिक,सामाजिक आणि राजकीय वाटचालीचा आढावा घेतला असता त्यांनी दिलखुलासपणे विविध गोष्टींवर चर्चा केली. आपल्या स्वप्नातील पनवेल बाबतही त्यांनी आपले विचार मांडले.

औरंगाबादमध्ये  रमेश साळवे आणि लता साळवे या राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये कविता  यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक आणि हायस्कुलचे शिक्षण औरंगाबाद मध्येच झाले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा त्यांनी शालेय जीवनात खूप जवळून पाहिला आणि समाजकार्यात योगदान देण्याची भावना मनात निर्माण झाली असे त्यांनी सांगितले. 'ज्या समाजात स्त्रियांचे स्थान उच्च असते, तो समाज प्रगती करतो,' हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार खूप भारावून टाकणारे होते असेही त्यांनी यावेळी सांगितले. डॉ बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून  त्यांनी शिष्यवृत्ती मिळवत उच्च शिक्षण सातार्‍यातील शासकीय महाविद्यालयात पूर्ण केले. बीएएमएस पास झाल्यानंतर त्यांनी पनवेलमध्ये येऊन स्वतःची डॉक्टरकीची प्रॅक्टिस सुरु केली.

डॉ. कविता साळवे (लग्नापूर्वीचे नाव) यांना नवीन पनवेलमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णांशी संवाद साधताना पायाभूत आणि नागरी समस्येच्या अभावामुळे आरोग्याशी संबंधित प्रश्‍न अस्वस्थ करीत होते. सिडकोच्या नियोजनाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या समस्या त्या स्वतः दररोज अनुभवत होत्या. त्यामुळे कुठेतरी बदल व्हायला हवा ही भावना त्यांच्या मनामध्ये बळावत गेली. दरम्यान मूळ जालना जिल्ह्याचे मुंबई स्थित किशोर चौतमोल यांच्याशी 2009 साली डॉ. कविता साळवे यांनी विवाह केला. किशोर चौतमोल हे त्यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचे युवा सहकारी म्हणून राजकीय क्षेत्रात काम करीत होते. स्वतःचा व्यवसाय सांभाळून ते समाजसेवेमध्ये तत्परतेने कार्य करीत होते. त्यांच्या राजकीय वाटचालीत त्यांच्या धर्मपत्नी म्हणून खंबीरपणे डॉ कविता चौतमोल यांनी साथ दिली.

राजकीय कार्यकर्त्याच्या पत्नी म्हणून कुटुंब सांभाळत आपली डॉक्टरकीसुद्धा सांभाळण्याची तारेवरची कसरत करावी लागली असा अनुभवही त्यांनी सांगितलं आहे. आपण समाजाचे देणे लागतो म्हणून सातत्याने काम करीत राहण्याचा निश्‍चय चौतमोल परिवाराने घेतल्यामुळे दोघांनी एकमेकांना सांभाळून घेत वाटचाल सुरु ठेवली. रायगड जिल्ह्याच्या प्रथम महानगरपालिकेची निवडणूक मे 2017  मध्ये लागली. प्रभाग क्रमांक 16 मधून भाजप युतीने डॉ कविता किशोर चौतमोल यांना उमेदवारी दिली. दांडग्या जनसंपर्काच्या बळावर त्या निवडून देखील आल्या. पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या चर्चेतील नावांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमावर होते. शेवटी भाजप युतीने सर्वानुमते त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून महापौरपदाची  धुरा त्यांच्याकडे सोपविली.

पनवेल महानगरपालिका ही नव्याने आकार घेत असली तरी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारत आहे. त्यामुळे 21 व्या शतकातील स्मार्ट शहर म्हणून पनवेल उभारी घेत असताना येथील नागरिकांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी जे जे शक्य आहे ते प्रामाणिकपणे करण्याची तयारी आहे असे डॉ कविता किशोर चौतमोल यांनी सांगितले आहे. तळोजा एमआयडीसी ही सर्वात मोठी एमआयडीसी पनवेल महानगरपालिकेत आहे; स्वप्ननगरी खारघर सारख्या वसाहती पनवेल महानगरपालिकेत आहेत. जुनी पनवेल नगरपरिषद आणि पनवेल मधील ग्रामीण भाग याचा सुद्धा पनवेल महानगरपालिकेत समावेश आहे अशा मिश्र वस्ती असलेल्या येथील नागरिकांना पनवेल महानगरपालिकेकडून खूप अपेक्षा आहेत याची मला जाणीव आहे त्यामुळे येत्या काळात विकास आराखडा तयार करताना सर्वांचा विचार केला जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्यापद्धतीने लोकाभिमुख कारभार करीत आहेत, तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून कॅशलेस सोसायटी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, अत्याधुनिक आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा, रोजगार निर्मिती, सर्वांसाठी घरे, डिजिटल महानगरपालिका,नागरिकांशी थेट संवाद याबाबींवर प्राधान्याने काम केले जाईल असे आश्‍वासन त्यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com