पंकजा मुंडेंनी नेते - कार्यकर्त्यांची जमविली मांदीयाळी आणि छत्रपतींचीही मिळविली साथ

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अहमदनगर, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील समर्थक आणि नेते तर उपस्थित होतेच. शिवाय राज्याच्या विविध भागातून मुंडेंचे चाहत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. शिवाय दोन्ही छत्रपती एकत्र आणून पंकजा मुंडे यांनी आपले राजकीय कौशल्य दाखवून दिले. दोन्ही छत्रपतींसह मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यक्षमतेचा आणि दिवंगत मुंडेंच्या सक्षम वारसदार असल्याचाही दाखला दिला.
पंकजा मुंडेंनी नेते - कार्यकर्त्यांची जमविली मांदीयाळी आणि छत्रपतींचीही मिळविली साथ

बीड : भाजपमधील प्रमुख ओबीसी चेहरा आणि 'मास लिडर' अशी ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांनी पक्षापलिकडे जाऊन संबंध निर्माण करुन जपण्याचा दिवंगत वडिल गोपीनाथ मुंडे यांचा वारसा जपल्याचे रविवारी झालेल्या स्मृतीदिन अभिवादन कार्यक्रमातून सिद्ध झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह परभणी, लातूर, अहमदनगर भागातील पक्षाचे नेते तर उपस्थित होतेच. शिवाय कधी एकत्र न येणारे दोन्ही छत्रपतींना एकत्र आणण्याचे राजकीय कौशल्य त्यांनी दाखवून दिले. पंकजा मुंडे यांच्यात दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे गुण असल्याने त्या सक्षम वारसदार असल्याची पावती दोन्ही छत्रपतींसह मुख्यमंत्र्यांनी दिली.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले, मंत्री प्रा. राम शिंदे, मंत्री महादेव जानकर, मंत्री विजय देशमुख, मंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दिलीप कांबळे अशा मंत्री आणि डझनभर आमदारांची उपस्थिती यावेळी होती. विशेष म्हणजे, जिल्ह्यासह अहमदनगर, परभणी, लातूर, नांदेड या भागातील समर्थक आमदारांसह चाहत्यांची या ठिकाणी मांदियाळी होती.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे ही मांदियाळी जमली तर भगिनी खासदार डॉ. प्रितम यांच्या चोख नियोजनामुळे कार्यक्रम रुपरेषेप्रमाणे यशस्वी झाला. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालविणाऱ्या पंकजा मुंडे यांनी पक्षापलिकडे जाऊन संबंध जपण्याचा वारसाही चालवित असल्याचा प्रत्यय पंधरवाड्यापूर्वी छगन भुजबळ यांची आपल्या मातुःश्री प्रज्ञाताईंसह भेट घेतल्यानंतर आला होता. मात्र, सर्वच बाबतीत विरोधी टोक असलेले सातारचे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांना एकत्र आणल्यानंतर यावर शिक्कामोर्तबच झाले. 

दोन्ही छत्रपतींनी दिवंगत गोपीनाथराव मुंडेंच्या आठवणींना तर उजाळा दिलाच. शिवाय त्यांच्यावर असलेला जिव्हाळा अधोरेखित केला. एवढेच नाही तर दोघांनीही पंकजा मुंडे व प्रितम मुंडेंना बहिण म्हणून साथ देण्याचा दिलेला शब्द या भगिनींच्या भावी राजकीय वाटचालीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. ‘कधीही हाक मारा साथ द्यायला तयार आहे’ असा शब्द देत ‘मी कालही तुमचा होतो, आजही तुमचा, भविष्यात काहीही बदल होणार नाही’ असे छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले.

''मुंडे साहेबांच्या कोणताही कार्यक्रम आमच्या हक्काचा असून केवळ बहिणीसाठी हक्काने आलो आहे. कधीच एकत्र न येणारे आम्ही दोन्ही राजे केवळ दिवंगत मुंडेंमुळे आज एका व्यासपीठावर आलो आहोत. मुंडे भगिनींच्या मागे दोन्ही छत्रपतींची ताकत आहे," असा शब्द छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिला. 

सक्षम वारसदार असल्याची पावती
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती खासदार उदयनराजे भोसले व छत्रपती खासदार संभाजी राजे भोसले यांनी पंकजा मुंडे या दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सक्षम वारसदार असल्याची पावती दिली. ग्रामविकास विभाग आणि इतर खात्यांतून पंकजा मुंडेंनी मोठे काम केल्याचे श्री. फडणवीस म्हणाले. तर, दिवंगत मुंडेंप्रमाणे संघर्षाचा वारसा जपत रडणार नाही तर तुमच्यासाठी लढणार ही पंकजा मुंडे यांची घोषणा मुंडेंचा वारस असल्याची साक्ष असल्याचे उदयनराजे म्हणाले.

https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com