Pankaja Munde says she is good student | Sarkarnama

मी चांगली  विद्यार्थींनी , गुरुजींच्या कार्यक्रमाला वेळेवर आले :पंकजा मुंडे

प्रवीण फुटके 
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सहसा एका व्यासपीठावर येत नाहीत. मात्र, साहित्यीक आबासाहेब वाघमारे यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त दोघेही एका व्यासपीठावर आले होते. 

परळी वैजनाथ (जि. बीड) : सहसा एका व्यासपीठावर येण्याचे टाळणारे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे रविवारी होमपिच असलेल्या परळीत एका व्यासपीठावर आले. मात्र, एकमेकांना चिमटे काढण्याची संधी दोघांनीही सोडली नाही. या दोघांची  जुगलबंदी परळीकरांत दिवसभर चर्चिली गेली .  दोघा बहीण भावांचा  ‘मीच हुशार’ हा दावा असला तरी  हुशार कोण हे विधानसभा निकालानंतरच कळणार आहे.  

सात वर्षांपूर्वी राजकीय दुरावलेले ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एका व्यासपीठावर सहसा आढळत नाहीत. जिल्ह्यात तर असा योग अगदीच दुर्मिळ आहे. मात्र, परळी शहरातील जेष्ठ साहित्यक आबासाहेब वाघमारे यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाने दोघांना एका व्यासपीठावर आणले. ऐकमेकांच्या अपरोक्ष एकमेकांवर नाव घेऊन किंवा नाव न घेता टिका आणि आरोपांची झोड उठविणाऱ्या या दोन्ही नेत्यांनी या कार्यक्रमात टिका - आरोपांना फाटा दिला असला तरी चिमटे काढण्याची संधी सोडली नाही.

 दुसरीकडे नियोजित कार्यक्रमाला जायचे असल्याने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे कार्यक्रमाला अगोदर आल्या. वास्तविक शिष्टाचारानुसार त्यांचे भाषण सर्वात शेवटी होणे अपेक्षित असले तरी दुसरीकडे जायचे असल्याने त्यांनी क्रम सोडून अगोदरच भाषण उरकून घेतले. पण, कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपेक्षा धनंजय मुंडें उशिरा हजर झाले आणि नेमका हा मुद्दा पकडून पंकजा मुंडेंनी ‘मी चांगली  विद्यार्थींनी असून गुरुजींच्या कार्यक्रमाला वेळेवर आले’ असा चिमटा काढला. 

गणेशोत्सवात धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमातील सपना चौधरीच्या नृत्यावरुन चर्चा झाली होती. याबद्दलही पंकजा मुंडेंनी परळीतील सांस्कृतिक वातावरण बदलायचे असल्याचा दुसरा चिमटा काढला. फक्त टिका न करता प्रत्यक्ष काम करुन दाखवा असा टोलाही त्यांनी लगवाला.

 हे र्व सर्व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ऐकत होते. मात्र, भाषण करुन पंकजा मुंडे निघून गेल्या आणि काही वेळाने धनंजय मुंडेंचे भाषण झाले. धनंजय मुंडेंनीही चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. बहुतेक कोणत्याही कार्यक्रमात विरोधी पक्ष अगोदर बोलतात सत्ताधारी त्याचे उत्तर देतात, पण या कार्यक्रमात सत्ताधारी अगोदर बोलले, कारण त्यांना माहिती आहे की, येणाऱ्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन होणार असल्याने आतापासूनच त्याची सवय लागावी असा चिमटा मग धनंजय मुंडेंनी काढला. तर, लवकर पोचल्याने आपण हुशार विद्यार्थी या पंकजा मुंडेंच्या दाव्यावरही ‘विधानसभेच्या निकालाच्या मार्कशिटवर हुशार विद्यार्थी कोण हे कळेल’ असा चिमटा धनंजय मुंडेंनी काढला. 
 

संबंधित लेख