PANKAJA MUNDE OFFERS MLA SONVANE TO JOIN BJP | Sarkarnama

आमदार शरद सोनवणे यांना भाजपात येण्याचे पंकजा मुंडेंचे निमंत्रण

अर्जुन शिंदे
गुरुवार, 10 जानेवारी 2019

मनसे आमदार सोनवणे शिवसेना नेत्यांच्याही संपर्कात असल्याची आधी चर्चा होती. आता थेट भाजपची आॅफर आल्याने ते आगामी काळात काय करणार, याची उत्सुकता राहणार आहे. 

आळेफाटा : मनसेचे जुन्नर मतदारसंघातील आमदार शरद सोनवणे यांना थेट भाजपमध्ये येण्याची आॅफर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. सोनवणे हे नेहमीच विविध पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे नक्की कोणाची आॅफर स्वीकारणार, याची उत्सुकता आहे.

आळे (ता. जुन्नर) येथे श्री ज्ञानेश्वर महाराज वेदप्रणित रेडा समाधी देवस्थानच्या महाराष्ट्र शासनाच्या ' ब ' वर्ग तीर्थक्षेत्र विकास निधीतून मंजूर झालेल्या, सुमारे दोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्याच्या महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की तुमच्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी तुम्हाला सहकार्य करणारे सगळे भाजपाचेच मंत्री आहेत. यामुळे तुम्ही आमच्यासोबत जास्त कम्फर्टेबल आहात. तुम्ही काहीही इकडेतिकडे बघायची गरज नाही. एवढ्या सगळ्या मंत्र्यांनी एवढे सांभाळले, या मंत्र्यांना कुठेही सोडून जायची गरज नाही.

``आमच्याबरोबर या ... कुठेही जायची चिंता नाही. मित्रपक्ष आहे म्हणून एवढा निधी दिला, आमच्याच पक्षात आल्यानंतर केवढा निधी देऊ ! ..याचा विचार करण्याएवढे तुम्ही निश्चित हुशार आहात,`` असे त्यांनी सांगितले. 
पंकजा यांच्या या आवाहनाला उपस्थितांनीही टाळ्या वाजवून जोरदार दाद दिली. मुंडे यांच्या आधी सोनवणे यांचे भाषण झाले होते. त्यामुळे मुंडे यांच्या आॅफरविषयी सोनवणे काहीच बोलले नाहीत.

संबंधित लेख