pankaja munde mass leader | Sarkarnama

बीडच्या वाघिणीचे ट्विट, चित्रातून नेमका हल्ला कुणावर, नेमका वेध कुणाचा ?

दत्ता देशमुख
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

भावनेचे राजकारण करत असल्याचा आरोप विरोधक करत असले तरी आपण भावनात्मक राजकारण करतो असे पंकजा मुंडे म्हणत असतात. भावनांचा झालेला कोंडमारा त्यांनी यापूर्वीही सोशल मिडीयातून व्यक्त केलेला आहे. आता त्यांनी शांत बसलेला सिंह आणि त्याच्या कुशीत बछडा असा फोटो आपल्या ट्विटर हॅंडलला ट्‌विट केला आहे. या ट्विटमध्ये चित्राशिवाय कुठलाही मजकूर नसून यामागे त्यांची नेमकी काय भावना आणि फोटोचा अर्थ काय असा प्रश्न राजकीय जाणकारांना पडला आहे. 

बीड : " भावनेचे राजकारण करत असल्याच्या विरोधकांच्या आरोपाला आपण भावनेनं राजकारण करते, भावनेमुळेच सामान्यांबद्दल आत्मियता ' 
असल्याचे प्रत्युत्तर पंकजा मुंडे देत असतात. काल रात्री त्यांनी सव्वा अकरा वाजता केलेल्या एका ट्‌विटमध्ये त्यांना नेमके काय म्हणायचे असा प्रश्न पडला आहे. शांत बसलेला सिंह आणि कुशीत बछडा असा फोटो आपल्या ट्‌विटर हॅंडलवर त्यांनी ट्‌विट केला आहे. या ट्‌विटमध्ये कुठलाही मजकूर नसून यामागे त्यांची नेमकी काय भावना आणि फोटोचा अर्थ काय, आपण सिंहाचा बछडा आहोत हे तर त्यांना विरोधकांना सांगायचे नसेल असाही याचा अर्थ काढला जात आहे. 

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी ऊसतोड मजूरांच्या प्रश्नावर कायम संघर्ष केला. भगवानगड आणि संत भगवानबाबांना त्यांनी कायम सर्वोच्च मानले. गडावरुन समाजाला दिशा देणाऱ्या दिवंगत मुंडेंनी या ठिकाणाहूनच आपल्या भूमिकाही अनेक वेळा जाहीर केल्या.

मात्र, मागच्या दोन वर्षांपासून गडावरील दसरा मेळावा आणि तेथील भाषणाचा मुद्दा कळीचा ठरला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी पंकजा मुंडे यांनी संत भगवानबाबांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे दसरा मेळावा घेतला. या ठिकाणी संत भगवानबाबांचे स्मारक उभारणीचे कामही सुरु झाले आहे. दरम्यान, दिवंगत मुंडे यांचा वारसा सांभाळणाऱ्या पंकजा मुंडे यांच्याकडे ऊसतोड मजूरांचे नेतृत्वही आले असून त्या साखर संघावर लवादही आहेत. 

गेल्याच आठवड्यात ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदारांच्या प्रश्नांवर बीडमध्ये मेळावा झाला. या मेळाव्यात त्यांनी या घटकाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्याबरोबरच या घटकाचे नेतृत्वापुढे मंत्रीपद फिके असल्याचे म्हटले होते. याच वेळी त्यांनी जवळ येऊन ठेपलेल्या दसरा मेळाव्यासाठी सावरगाव घाट येथे येण्याची सादही उपस्थितांना घालून स्मारक उभारणीसाठी एक विट देण्याचे आवाहन केले. 

याच मुद्द्यांवर सोमवारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नाव न घेता टिका केली. दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी भगवान गडाला आणि संत भगवान बाबांना सर्वोच्च मानले. त्या गडावर भाषणाची परवानगी नाकारली तर गड तुमचा शत्रू कसा असा सवाल करत आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना पंढरपुरच्या विठ्ठलाची पुजा नाकारल्यानंतर त्यांनी विठ्ठलाचे जन्मस्थळ शोधले नाही असेही मुंडे म्हणाले. चार वर्षांत ऊसतोड मजुरांचे प्रश्न सुटले नसून या प्रश्नांवर केवळ राजकारण केले जात असल्याचेही धनंजय मुंडे पाटोदा येथे संत भगवानबाबा जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात म्हणाले.

दरम्यान, हा कायक्रम सायंकाळी संपल्यानंतर पंकजा मुंडे यांनी रात्री 11 वाजून 14 मिनीटांनी ट्‌विट केले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या टिकेला तर त्यांनी या ट्‌विटमधून उत्तर दिले नाही ना असे वाटायला लागले आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या चित्रात सिंह डोळे मिटून शांत बसलेला असून कुशीत बछडा आहे. त्यामुळे या पोस्टमध्ये त्यांनी कुठलाही मजकूर लिहलेला नसल्याने आपण सिंहाचा बछडा असून योग्य वेळी उत्तर देऊ असे तर त्यांना म्हणायचे नसेल. गोपीनाथरावांच्या निधनानंतर काही ठिकाणी त्यांचा उल्लेख वाघीण असाही झाला होता. या चित्रातून त्यांनी पुढच्या लढाईचाच संदेश दिल्याचे मानले जाते. 

संबंधित लेख