Pankaja Munde launches direct attack On Dhanajay Munde | Sarkarnama

ज्यांचे राजकारणच तोडपाणीचे, त्यांचा वारसा नेमका कोणाचा?  पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्ला 

दत्ता देशमुख 
शनिवार, 5 जानेवारी 2019

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळी येथे विशेष निधीतील पाच लाख रुपयांच्या कामांचे भूमिपुजन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. परळी पालिकेतील पराभवामुळे मान खाली घालावी लागल्याचे शल्य त्यांनी बोलून दाखविण्याबरोबरच विरोधकांवर चौफेर टिका आणि आरोपांची झोड उठविली. 

बीड : प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांची उमेदवारी फायनल केल्यानंतर जणू पंकजा मुंडेंनी आगामी निवडणुकीचे रणशिंग होमपिच परळीतूनच फुंकले. जोरदार फटकेबाजी करताना शहरातील गुंडगिरी संपविण्यासाठी पाठीशी असल्याचे जाहीर केले . 

 समोरुन येणारा वार माझ्या खांद्यावर झेलेल, निर्भयपणे जगा, घाबरू नका असा विश्वास दिल्याने गुंडगिरी कोणाची, भिती कोणाची असा प्रश्न तर निर्माण झालाच आहे. शिवाय त्यांनी एकीकडे मुंडे साहेबांचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडे त्यांचा अवमान करण्याचा काहींचा उद्योग बनला असल्याचा टोलाही लगावला. 

प्रत्येक वीस किलोमिटर अंतरावर ज्यांचा वारसा बदलतो, ज्यांचे राजकारणच तोडपाणी करून होते त्यांनी त्यांनी आपला वारसा नेमका कोणाचा? हे एकदा ठरवूनच घ्यावे असा टोलाही नाव न घेता लगावला. 

राष्ट्रवादीची सत्ता असताना परळीसाठी दमडीही न आणणारे आता केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना फुकटचे श्रेय कसे घेत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

 तुम्ही केलेल्या पापाची क्षमा मुंडे साहेबांना हयात असतांना मागावी लागली, तुमच्यामुळं लोकं दूर गेली हे जनता अजून विसरली नाही असेही त्या म्हणाल्या. 

परळी लोकनेते गोपीनाथराव मुंडे व आपली जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने जनतेची काळजी घेणे कर्तव्य आहे. ज्या लोकांनी इथलं वातावरण गढूळ केलयं त्यांना साथ देण्याची चूक कधीही करू नका असे आवाहनही त्यांनी केले. 

विविध येाजनांतून आपण निधी आणत असलो तरी पालिकेत सत्ता नसल्याने कांही करता येत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली. यावेळी खासदार डॉ. प्रितम मुंडे व आमदार सुरेश धस यांनीही टिकेची झोड उठविली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख