pankaja munde kharwandi programme | Sarkarnama

खरवंडी मेळाव्यात पंकजा मुंडे ऊसतोडणी कामगारांना काय देणार ?

मुरलीधर कराळे
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

मी ऊसतोडणी कामगारांचे प्रतिनिधीत्तव म्हणून काम करते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी जीवनभर कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष केला. पंकजा मुंडेही त्यांचाच आदर्श घेवून कामगारांचे प्रश्न सोडवित आहेत.

- मोनिका राजळे, आमदार 

नगर : पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत भाजपचाच उमेदवार आणायचा असा विडा घेवून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार मोनिका राजळे यांना भक्कम साथ दिली आहे. मागील दौरा होऊन तीन आठवडे होते न होते तोच पुढील एक आॅक्टोबरला मुंडे पुन्हा मतदारसंघात येणार आहेत.  ऊस तोडणी कामगारांच्या मेळाव्याच्या उदघाटनासाठी येत असलेल्या मुंडे कामगारांच्या पदरात काय टाकणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात आमदार राजळे यांनी जनसंपर्क अधिक वाढविला आहे. विविध उदघाटनांच्या निमित्ताने त्या मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यातच भाजपच्या नेत्यांच्या सभा घेवून वातावरणनिर्मिती होत आहे. सात तारखेस ढोरजळगाव-ने (ता. शेवगाव) येथे मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत सुमारे सात कोटी रुपये खर्चाच्या कामांचे उदघाटन मुंडे यांच्या हस्ते झाले होते. त्या निमित्ताने त्यांनी आमदार राजळे यांच्या कामाचे काैतुक केले. जिल्ह्यातील भाजप नेत्यांनीही या मतदारसंघावर आमचे विशेष लक्ष असल्याचे सांगितले.

आगामी काळात पुन्हा या मतदारसंघाचा गड जिंकायचा असे भाजप कार्यकर्त्यांना मुंडे यांनी बजावून सांगितले होते. आता लगेचच एक आॅक्टोबरला पुन्हा त्या खरवंडी (ता. पाथर्डी) येथे येत आहेत. ऊस तोडणी कामगार व मुकादम मेळाव्याचे उदघाटन मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्ताने त्या ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नांवर काय बोलतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  
 

 

संबंधित लेख