Pankaja Munde invites all for Dasara Melava | Sarkarnama

दसरा मेळावा शक्ती प्रदर्शनासाठी नाही ,तर शक्तीच्या दर्शनासाठी :पंकजा मुंडे

दत्ता देशमुख
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

संघर्षाच्या वाटचालीमध्ये सीमोल्लंघनाचा उत्सव आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही. मी येत आहे ..तुमच्यासाठी ..आपल्यासाठी ..तुम्ही पण या !!


- पंकजा मुंडे,

मंत्री ग्रामविकास व महिला आणि बालविकास, 

बीड : ‘संघर्षाच्या वाटचालीत सिमोल्लंघनाचा उत्सव आपल्याला उर्जा आणि प्रेरणा दिल्याशिवाय राहत नाही. मी येत आहे तुमच्यासाठी...आपल्यासाठी तुम्ही पण या. दसरा मेळावा  शक्ती प्रदर्शनासाठी नाही ,तर शक्तीच्या दर्शनासाठी !’ अशी साद घालत पंकजा मुंडे सिमोल्लंघनासाठी सज्ज झाल्या आहेत. 

संत भगवानबाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने होत विजयादशीमच्या मुहूर्तावर गुरुवारी होणारा हा दुसरा दसरा मेळावा आहे. यंदा मेळाव्याची जोरदार तयारी झाल्याने मेळाव्याकडे आणि पंकजा मुंडे काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे. 

संत भगवानबाबांची कर्मभूमी असलेल्या भगवानगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे भाषण होई. ऊसतोड मजूर आणि समाजाला दिशा आणि उर्जा देण्याचे काम येथूनच होई. मात्र, दिवंगत मुंडेंच्या पश्चात गडावर राजकीय भाषण नाही अशी भूमिका गडाच्या महंतांनी घेतली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी दोन वर्षांपूर्वी गडाच्या पायथ्याला मेळावा घेतला. तर, गेल्या वर्षी त्यांच्या पुढाकाराने बाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथे मेळावा झाला. 

यंदा होत असलेला दुसरा दसरा मेळावा आहे. यंदा राज्यभरातील पंकजा मुंडेंचे समर्थक मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, तेलंगणा, मध्यप्रदेश आदी ठिकाणांहूनही भाविकांची उपस्थिती राहणार आहे. मेळाव्याच्या तयारीचे जिल्हाभरात स्वागत बॅनर आणि कमानी लागल्या आहेत. 

दरम्यान, मागच्या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी घोषित केलेल्या संत भगवानबाबांच्या स्मारकाचे लोकार्पणही होणार आहे.

दरम्यान, मेळाव्याबाबत पंकजा मुंडे यांनी ‘संघर्षाच्या वाटचालीमध्ये सीमोल्लंघनाचा उत्सव आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही. मी येत आहे ..तुमच्यासाठी ..आपल्यासाठी ..तुम्ही पण या !’ अशी भावनिक साद घातली आहे. दरम्यान, तोंडावर आलेली लोकसभा निवडणुक आणि राज्य आणि जिल्ह्यातील राजकीय वातावरणात पंकजा मुंडे मेळाव्यात काय बोलणार, याकडे लक्ष लागले आहे.

 

संबंधित लेख