Pankaja Munde Beed Sugarcane workers Program | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

माझ्या बाबतीत सर्वच अंदाज चुकत जाणार : पंकजा मुंडे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

ऊसतोड मजूर, वाहतूकदार व मुकादम यांच्या प्रश्नांवर दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी कायम संघर्ष केला. हा घटक मुंडेंच्या राजकारणासाठी कायम बलसस्थान ठरला. त्यांच्या पश्चात साखर संघावर लवाद म्हणून पंकजा मुंडे काम पाहत आहेत. 

बीड : मेळाव्याला जागा अपूरी पडल्याने कोणाला छतावर, कोणाला खिडक्यात उभारुन भाषण ऐकावे लागत आहे. जागेचा अंदाज आला नाही. मात्र, माझ्या बाबतीत सर्वच अंदाज चुकत जाणार असे प्रतिपादन ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे केले. ''दिवंगत गोपीनाथराव मुंडेंनंतर ही पोरकी काय करणार, मुलगी वारसा असते का, असे प्रश्न विचारले जात होते. पण, सर्वांचे अंदाज चुकले. दिवंगत मुंडेंनी हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या त्यांच्या मुलीला तुम्ही मायेच्या पदराआड घेतले," असेही त्या म्हणाल्या. 

ऊसतोड मजूर, वाहतूकदार व मुकादमांच्या विविध प्रश्नांवर सुरु असलेल्या संपाच्या निमित्ताने शनिवारी मेळावा झाला. यामध्ये पंकजा मुंडे बोलत होत्या. ''या घटकाची साथ असल्यानेच माझ्या आवाजाला कोयत्याची धार आहे. दिवंगत मुंडेंच्या जागी साखर संघावर लवाद म्हणून मिळालेली नेमणूक हे माझ्यासाठी सर्वाच्च पद आहे. यापुढे लाल दिवा व इतर पदे फिकी आहेत." ऊन, वारा, वादळात संघर्ष करणाऱ्या ऊसतोड कामगारांसाठी आपणही ऊन, वारा व वादळाची तमा न बाळगता तुमच्या सोबत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. दिवंगत मुंडेंनंतर ऊसतोड कामगारांनी जी माया दिली त्याचे उपकार विसरता येणार नाहीत. तुमच्या पायाखाली कातडी अंथरली तरी उपकार फिटणार नाहीत असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

संघटनेच्या मागण्या न्याय असून त्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, आपणही कायेता घेऊन तुमच्या सोबत असू असेही पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना सांगितले. गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळ दसऱ्यापूर्वी कार्यान्वित होईल. मजूरांच्या घरकुल योजनेसाठी प्रयत्न करणार आहे. आगामी दसरा मेळावा सावगाव घाट (ता. पाटोदा) येथेच होणार असून याला उपस्थितीसाठी त्यांनी साद देताच मोठा प्रतिसाद मिळाला. खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, आर. टी. देशमुख, संगीता ठोंबरे, सविता गोल्हार, रमेश आडसकर, केशव आंधळे, श्रीमंत जायभाये, आदित्य सारडा, गोरक्ष रसाळ उपस्थित होते. 

दिवंगत मुंडे स्टाईलमध्ये भाषणाची सुरुवात
‘मी पोचत नसले तरी माझा आवाज तुमच्या पर्यंत पोचत आहे’ ...पोचतोय का? असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणताच उपस्थितांतून ‘हो....’असा प्रतिसाद आला. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे सभेत असेच म्हणायचे, अशी आठवणही पंकजा मुंडे यांनी काढली. 

संबंधित लेख