राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांवर दरोडे घातले : पंकजा मुंडेंचा धनंजयरावांवर पलटवार
पंकजांच्या उत्तुंग नेतृत्वाला जपा : विनायक मेटे
" परळीच्या ग्रामपंचायत निकालाचा शंखनाद दिल्ली दरबारी वाजला आहे. पंकजा मुंडेंचे नेतृत्व दिवंगत गोपीनाथ मुंडेंसारखे आहे. त्या राज्याच्या प्रमुख नेत्यांपैकी आहेत. त्यांनी मेहनतीने स्वतःचे कर्तृत्व सिध्द केले आहे. या नेतृत्वाला जपण्याचे काम करा ,"असे आमदार विनायक मेटे म्हणाले.
परळी (जि. बीड) : राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये काढलेला मोर्चा शेतकऱ्यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा मेळा होता. मोर्चात भाषण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी साखर कारखाने, सुतगिरण्यांना कुलूप लावले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी बुडवत शेतकऱ्यांवर दरोडा टाकण्याचे पाप केल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला.
सोमवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये मोर्चा काढला होता. यावेळी त्यांच्यासह माजी मंत्री प्रकाश सोळंके, आमदार अमरसिंह पंडित आदी नेत्यांनी भाजप सरकारवर जोरदार टिका केली होती.
पंकजा मुंडेही या टिकेच्या भडीमारातून सुटल्या नव्हत्या. त्याला गुरुवारी (ता. २६) पंकजा मुंडेंनी शेलक्या शब्दात उत्तर दिले. यावेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनीही पंकजांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
परळी मतदार संघातील भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार श्रीमती मुंडे यांच्या हस्ते झाला. श्री. मेटेंसह आमदार आर. टी. देशमुख, लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे, कृषी मुल्य आयोगाचे पाशा पटेल, रमेश पोकळे, ज्येष्ठ नेते रमेश आडसकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, संतोष हंगे, युध्दजित पंडित उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपला घवघवीत यश देऊन जनतेने मागील पराभवाचा वचपा काढल्याचा दावा पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना केला. त्या पुढे म्हणाल्या , "दसरा मेळाव्यापेक्षा मोठा मोर्चा काढू अशी वल्गना करणाऱ्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मोर्चा नावाला शेतकऱ्यांचा पण बोलणारे दरोडेखोर होते . ज्यांनी कारखाना, सुतगिरण्यांना कुलूप लावले, शेतक-यांची एफआरपी ची रक्कम बुडवली, शेतक-यांचे संसार उद्ध्वस्त केले तेच आता खोटा कळवळा दाखवत आहेत. "
" दारू, मटणाच्या पार्ट्या देऊन मत लाटण्याचे काम करणाऱ्या या नेत्यांनी मतदारसंघाला एका वेगळ्या वाटेवर नेऊन ठेवले आहे . ग्रामपंचायत निकालाच्या खोट्या बातम्या देणारांनी मुंडे साहेबांचे नाव न घेता हेड लाईन होऊन दाखवावी असा टोलाही पंकजा मुंडेंनी लगावला .