आजोबा आणि मामाही शिक्षक होते त्यामुळे शिक्षकांबद्दल कळवळा : पंकजा मुंडे

  आजोबा आणि मामाही शिक्षक होते त्यामुळे शिक्षकांबद्दल कळवळा : पंकजा मुंडे

बीड : शिक्षक हा समाज घडवित असतो. मात्र, गैरसोयीच्या ठिकाणामुळे काही शिक्षक नेहमी त्रस्त असतात. आपल्याला या वर्गाचा कळवळा आहे. कारण, आपले वडिल दिवंगत गोपीनाथराव मुंडे हे एका शिक्षकाचेच जावई होते तर मामा दिवंगत प्रमोद महाजनही शिक्षक होते असे ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. 

ग्रामविकास विभागाने गेल्या महिन्यात एक लाखांवर शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या केल्या. त्यामुळे अनेकांना न्याय मिळाल्याची भावना आहे. याबद्दल त्यांचा रविवारी बीडमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिक्षकांच्या ऑनलाईन व पारदर्शक बदल्या करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. या ऐतिहासिक निर्णयाचा दुर्गम भागातील शिक्षकांना लाभ झाला असे त्यांनी सांगितले. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, माझे वडिल दिवंगत गोपीनाथराव मुंडे हे एका शिक्षकाचेच जावई होते. माझे आजोबा व्यंकटेश महाजन व मामा प्रमोद महाजन हे दोघेही शिक्षक होते. त्यांनी ज्ञानदानाचे कार्य अतिशय यशस्वीपणे पुढे नेले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे देखील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही असायचे. माझं खातं हे वंचितांच आहे. ज्यांच्याकडे वशिला नाही, ताकद नाही त्यांच्या पाठिशी मी खंबीरपणे उभी असते. शिक्षणाची काळजी करायची असेल तर पहिल्यांदा शिक्षकांची करावी लागेल हे ओळखून ऑनलाईन बदल्यांचा मी निर्णय घेतला असे त्यांनी स्पष्ट केले. 

गेले वर्षभर आपल्या मंत्रालयात शिक्षकांचीच गर्दी असायची. ही मंडळी बदलीसाठी आल्यानंतर मुलांना कोण शिकवत असेल असा प्रश्न आपण शिक्षकांना विचारत होतो. त्यामुळे शिक्षकांपेक्षा शिक्षणाची काळजी करुन हा निर्णय घेतला. आपल्याला कोणी कितीही पटवून सांगीतले तरी आपण अंतकरणाला पटलेलाच निर्णय घेतो, एकदा घेतलेला निर्णय आणि दिलेला शब्द बदलत नाही असेही त्या म्हणाल्या. या निर्णयामध्ये या विभागाचे सचिव असीम गुप्ता यांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले. खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार आर. टी देशमुख, आमदार भीमराव धोंडे, सुरेश धस, संगीता ठोंबरे, बदामराव पंडित, रमेश पोकळे, रमेश आडसकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, आनंद पिंगळे उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com