pankaja munde and maratha kranti morcha | Sarkarnama

मराठा आरक्षण प्रश्नावर मी तुमची दूत बनेन - पंकजा मुंडे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

परळी येथे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनाला गुरुवारी ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली. समाजाच्या वेदनेविषयी आपल्या मनात स्वच्छ भावना आहे. मराठा आरक्षणासाठी आपणही भर उन्हात दिवसभर रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन केले होते असे त्या म्हणाल्या. 

बीड : मागील तीन वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या आंदोलनाची अख्ख्या जगाने दखल घेतली. लाखोंचा जनसमुदाय हातात भगवा घेऊन रस्त्यावर उतरला पण कोणाला इजा केली नाही. त्यामुळे समाजाला खाली मान घालावी लागली नाही. मराठा आंदोलनात छत्रपती शिवरायांचे संस्कार असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. मराठा आरक्षण प्रश्नावर दूत म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची तयारीही त्यांनी दाखविली. महाराष्ट्र शिवभक्तांचा असून तलवार हाती घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांनी हिंमतीने लढण्याची शिकवण दिली आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे व आरक्षणाचा ठोस निर्णय होईपर्यंत मेगा भरती रद्द करावी या मागणीसाठी परळी येथे मोर्चानंतर सुरु झालेल्या ठिय्या आंदोलनाच्या नवव्या दिवशी गुरुवारी पंकजा मुंडे यांनी भेट दिली. संयोजकांनी मागण्यांविषयी भूमिका मांडल्यानंतर पंकजा मुंडे यांनी संवाद साधला. आपण मंत्री म्हणून नाही तर तुमच्या संवेदना जाणणाऱ्या नेत्याची मुलगी म्हणून येथे आली आहे अशे त्यांनी सांगितले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आपलीही भावना असून यासाठी आपणही विरोधी पक्षात असताना आंदोलन केल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. वडवणी चौकात भर उन्हात रस्त्यावर दिवसभर ठाण मांडल्याचे उदाहरण त्यांनी यावेळी सांगीतले. अशा समुदायासमोर बोलण्यासाठी केवळ तोंड आणि जीभ नाही तर निधड्या छातीची आणि जिगर असलेल्या नेतृत्वाची गरज असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

मराठा आरक्षणाबाबत कोर्टाचा निकाल लवकर लागण्यासाठी सरकारला भाग पाडायला आपणही मराठा समाजासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. ही लढाई केवळ लढायची नसून जिंकायचीही आहे. त्यामुळे कोणी जीव देऊ नका असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. जीव देऊ नका अशी शपथ देत असल्याचेही त्या म्हणाल्या. जातीच्या भिंती पुढाऱ्यांनी उभ्या केल्या असून आपण पुढारी नाहीत. आपल्याला जातीच्या भींती तोडून समाजकारण करायचे असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

आंदोलकांवर चुकीचे गुन्हे दाखल झाले असतील त्याबाबतही योग्य निर्णय घेतला जाईल. मागासवर्गीय अहवाल येण्याबाबतही पुढाकार घेऊ. एकेकाळी राज्यकर्ता असलेला मराठा समाज वंचित आणि गरजवंत झाला आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला आपले समर्थन असल्याची ग्वाही त्यांनी दिली. याबाबत तुमची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून देऊ. त्यावेळी नकार देऊ नका असे आवाहनही त्यांनी केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख