pankaja munde | Sarkarnama

परळी बाजार समितीत पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंकडून धक्का

दत्ता देशमुख/लक्ष्मण वाकडे
सोमवार, 15 मे 2017

बीड : परळी हे अनेक बाबींमुळे बीड जिल्ह्याचे केंद्रबिंदू आहे. परळीत धनंजय आणि पंकजा या बहीण भावामधला संघर्ष नवा नाही या संघर्षाचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होतात आणि त्याचे पडसाद राज्यभरही उमटतात.

बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे शेतकरी विकास पॅनलला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पंडित अण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनलने जोरदार धक्का देऊन पराभूत केले आहे. पालकमंत्र्यांच्या पॅनलला चार जागांवर समाधान मानावे लागले. तर, विरोधी पक्षनेत्यांच्या पॅनलने 14 जागा जिंकत विजय मिळवला. 

परळी मतदार संघातील राजकारण अलीकडे या बहीण भावंडांभोवतीच फिरत आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने वैद्यनाथ बॅंक व वैद्यनाथ साखर कारखाना निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलवर मात केली होती.

जिल्हा बॅंकेवरही वर्चस्व मिळवण्यात पंकजा मुंडे यांनी यश मिळवले. पण, पुढे परळी नगर पालिका, जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर मात केली. नगरपालिका निवडणुकीत परळीत भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. तर, राष्ट्रवादीने 27 जागा जिंकल्या. जिल्हा परिषदेलाही तालुक्‍यात भाजपचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. तर, परळी 
आणि अंबाजोगाई पंचायत समित्यांवर असलेली भाजपची सत्ता खालसा करण्यात धनंजय मुंडे यांना यश आले.

मात्र, राजकीय परिपक्वता आणि कसब पणाला लावून पंकजा मुंडे यांनी जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवत घसरलेली राजकीय गाडी पुन्हा रुळावर आणली. त्यामुळे राष्ट्रवादी बॅकफुटवर गेली. मात्र, त्यांच्या होमपिचमधील बाजार समिती निवडणुकीत पुन्हा त्यांची गाडी घसरली. दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्यापासून परळी बाजारसमितीवर त्यांचे बंधू 
पंडित अण्णा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता असे.

धनंजय मुंडेंच्या पक्षांतरानंतर ही समिती राष्ट्रवादीकडे गेली. पुढील कार्यकाळासाठी संचालकांच्या निवडीसाठी रविवारी मतदार होऊन आज (सोमवार) मतमोजणी झाली. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला 14 जागा मिळाल्या. तर, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले.

या निवडणुकीत सुरुवातीपासूनच दोन्ही भावंडांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती. कॉंग्रेसला सोबतीला घेऊन धनंजय मुंडे यांनी बेरजेचे राजकारण केले होते. दोन्ही गटांनी मतदारांना गिफ्ट देऊन सहलीवरही नेले. धनंजय मुंडे सुरुवातीपासून तळ ठोकून होते. तर, भाजपची धुरा डॉ. प्रीतम मुंडे यांच्या खांद्यावर होती. पंकजा मुंडे मात्र परदेशात होत्या. त्याचाच हा फटका असल्याचे मानले जात आहे. 

संबंधित लेख