Panjaka Munde targets Dhanajay Munde | Sarkarnama

धनंजय मुंडेंनी हिंमत होती तर स्वत: लोकसभा का लढविली नाही ?  : पंकजा मुंडे

दत्ता देशमुख 
सोमवार, 25 मार्च 2019

भाषणात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टिका केली. मी वडिलांचा गड बांधला त्यांनी चौथरा तरी बांधला का, असा सवालही त्यांनी केला. 

बीड : " आपण नेतृत्व करत असल्याने आपल्याला आरशात चेहरा पहायलाही वेळ मिळत नाही. मात्र, राज्याचे नेतृत्व करणारे मॉर्निंग वॉकला जातात, वजन सांभाळतात. स्वत: मागच्या दाराने येतात. हिंमत होती तर स्वत: लोकसभा का लढविली नाही?  '' असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.

स्वत:ला मिळणारे विरोधी पक्षनेतेपद अमरसिंह पंडित यांनी आमच्या भावाला (धनंजय मुंडे) यांना दिल्याचेही त्या म्हणाल्या. 

भाजपच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी निघालेल्या फेरीनंतर झालेल्या सभेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर चौफेर टिका केली. त्या म्हणाल्या ," बोलविलेले नेते येणार नसल्याचे राष्ट्रवादीची आजची सभा रद्द करावी लागली. मात्र, आरोप आमच्यावर करतात. त्यांचा रडीचा डाव लहानपणापासून माहित आहे . मात्र आपण बोलत नाही. माझ्यावर ते नेहमी टिका आणि आरोप करतात. "

" दारुच्या फॅक्ट्रीबाबत त्यांनी माझ्यावर आरोप केले . त्याबाबत  पत्रकारांनी ‘त्यांची पातळी घसरली आहे का,’ असे मला विचारले . त्यावर मी  त्यांची ( धनंजय मुंडेंची )तीच पातळी आहे असे म्हणाले . माझ्यावर  वडिलांच्या नाव घेऊन राजकारण केल्याची टिका करता. मात्र, मी जिवंत असेपर्यंत वडिलांचे नाव घेईन . तुमच्यासारखे लोकांचे जोडे तर उचलत नाही ना ? "अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला चढवला . 

" मी वडिलांच्या नावाने  गड बांधला, तुम्ही साधा वडिलांचा चौथरा तरी बांधला का?  प्रितम मुंडेंच्या राजकीय जन्माबाबत विचारणारे धनंजय मुंडे जिल्हा परिषद सोडता कुठली निवडणुक जिंकले ? तेंव्हा उपमुख्यमंत्री असलेल्या गोपीनाथराव   मुंडे  यांचे संपूर्ण पाठबळ असूनही  धनंजय  केवळ सव्वाशे मतांनी विजयी  झाले होते .  ऊसतोड कामगारांचा विषय आपण शरद पवारांसोबत बसून सोडविला ," असेही त्या म्हणाल्या . 

 सुजय विखेंच्या पक्षांतरावर टिका करणाऱ्या धनंजय मुंडे यांनीही राष्ट्रवादीत जाताना वडिलांना पुढे केले. त्यामुळे पंडितअण्णांना पराभवाचे तोंड बघावे लागले असेही त्या म्हणाल्या. 

संबंधित लेख