pandurang fundkar | Sarkarnama

असे घडलो आम्ही....

अरुण जैन 
मंगळवार, 30 मे 2017

राज्याचे कृषिमंत्री झालेले भाऊसाहेब ऊर्फ पांडुरंग फुंडकर यांना मंत्रिपद सहजासहजी मिळालेले नसून त्यांची सामाजिक जीवनातील तपश्‍चर्या यामागे आहे. 

बुलडाणा : राज्याचे कृषिमंत्री झालेले भाऊसाहेब ऊर्फ पांडुरंग फुंडकर यांना मंत्रिपद सहजासहजी मिळालेले नसून त्यांची सामाजिक जीवनातील तपश्‍चर्या यामागे आहे. 

आपल्या आठवणींना व वाटचालीला उजाळा देताना भाऊसाहेब म्हणाले की, जाणीवपूर्वक राजकारणात यावे असा उद्देश नव्हता. मात्र विद्यार्थी दशेपासून सामाजिक कार्याची आवड होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता म्हणून सामाजिक जीवनात कामाला सुरवात केली. कधी कोणते पद मिळावे अशी अपेक्षा ठेवली नाही. पद मिळो न मिळो काम करत राहणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मूलमंत्र किशोर अवस्थेपासूनच मनात भिनलेला आहे. संघ स्वयंसेवक असल्याने झालेल्या संस्कारामुळे देशप्रेमाची भावना बालपणीच जागृत झाली. मातृभूमीचे ऋण फेडावे या उद्देशाने मिळेल ती संधी घेऊन काम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला व आजतागायत सुरू आहे. 

जनसंघापासून खऱ्या अर्थाने राजकीय कारकिर्दीला प्रारंभ झाला. आणिबाणीविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. भारावल्याप्रमाणे काम केले. त्यामुळे तुरुंगात जावे लागले. त्यानंतर सातत्याने लोकांमध्ये राहणे हेच ध्येय राहिले. विधानसभेची निवडणूक लढविली व जिंकलीही. दोन वर्षातच विधानसभा बरखास्त झाली. त्यानंतर कॉंग्रेसची लाट असतानाही पुन्हा खामगावचा आमदार म्हणून निवडून आलो. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. कापसाच्या दरासाठी खामगाव ते आमगाव अशी पदयात्रा काढली. 

सर्वांना सोबत घेऊन चालणे, प्रत्येकाला मानसन्मान देणे या आपल्या भूमिकेमुळे पक्षाने अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. ती निवडणूकही आपण जिंकली. मात्र दोनच वर्षात पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागले. राजीव गांधींच्या हत्येमुळे कॉंग्रेसची प्रचंड लाट असतानाही या निवडणुकीतही अकोला लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला. 

यानंतर युती सरकारच्या काळात कापूस पणन महासंघाच्या मुख्य प्रशासकपदी नेमणूक झाली. पक्षाने संघटनात्मक सर्वोच्च जबाबदारी दिली. भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सतत तीन वर्षे कार्यरत राहिलो. दरम्यान विधान परिषदेवर नियुक्‍ती झाली आणि विरोधी पक्षनेते पद मिळाले. त्यानंतरही पक्षाने विधान परिषदेवर पाठविले. दरम्यानच्या काळात विविध शासकीय समित्यांवर काम करता आले. याशिवाय उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार देखील मिळाला. अशी मोठी राजकीय वाटचाल करताना अनेक वेळा संकटे आली, गावोगावी दुचाकीवर फिरून कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. सातत्याने पक्ष सांगेल त्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि पक्षाशी प्रामाणिक राहिलो ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण होय. 

विधानसभेच्या निवडणुकीत खामगाव मतदारसंघातून मुलगा आकाश याला जनतेने मोठ्या विश्‍वासाने निवडून दिले. या वेळी युतीची सत्ता आली. त्यातही आपण कधी मंत्रिपदाचा हट्ट धरला नाही. मात्र पक्षाने आजवर केलेल्या कार्याची दखल घेत कृषी खात्याची कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सोपविली. आपण भूमिपुत्र असल्याने व शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असल्याने आपल्या कार्यकाळात नवीन कृषी विषयक धोरण तयार करून त्याचा महाराष्ट्रातील अधिकाधिक जनतेला लाभ कसा होईल, या दृष्टीने प्रयत्न करण्याचा मानस आहे.

संबंधित लेख