PALKHI procession in pune | Sarkarnama

पालखी सोहळ्यात वारकरी विरुद्ध धारकरी : नक्की प्रकार काय आहे? 

विलास काटे 
सोमवार, 19 जून 2017

संभाजी भिडे यांच्या शिव प्रतिष्ठानच्या धारकऱ्यांची कार्यपद्धती संत विचाराला अनुसरून नसल्याने हा धुडगुस असून त्यावर कारवाई व्हवी, यासाठी मागील वर्षी आणि या वर्षी देखील तक्रार करण्यात आली होती. मात्र आम्ही कोणतेही अनुचित कृत्य करत नसल्याचा दावा प्रतिष्ठानने केला आहे. शक्ती आणि भक्ती यांचा संगम व्हावा, यासाठी वारीत सहभागी होत असल्याचे प्रतिष्ठानचे म्हणणे आहे.

आळंदी : संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा रविवारी (18 जून) पुण्यात दाखल झाल्यानंतर वेगळाच वाद निर्माण झाला. सांगलीच्या संभाजी भिडे यांच्या शिव प्रतिष्ठानचे दोन हजार कार्यकर्ते हातात मशाल आणि तलवारी घेत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यापुढे चालत होते, अशी तक्रार पोलिसांकडे चोपदारांनी केली. वारकऱयांच्या या दिंडीत हाती तलवार घेतलेली मंडळी कशासाठी, असा सवाल उपस्थित झाला. पालखी सोहळा जागेवरच थांबविण्यात आला. यामुळे वारकरी विरुद्ध धारकरी असा वाद पाहायला मिळाला. 

हा नक्की प्रकार काय आहे? संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा हा शिस्तबद्ध सोहळा असतो. अनेक गोष्टी परंपरेने आणि निष्ठेने पाळल्या जातात. दिंडीच्या क्रमांकापासून ते मानकऱ्यांच्या मानापर्यंत सारे आखीव-रेखीव असते. वारकरी म्हणज शांतता आणि सहिष्णुतेशी बांधिलकी असलेला पंथ आहे. या पंथात हिंसा वर्ज्य मानलेली आहे. असे असताना शिवप्रेमी म्हणविणारे संभाजी भिडे आणि त्यांचे कार्यकर्ते वारीत तलवार आणि मशाली घेऊन सहभागी होत असल्याबद्दल वारकरी संप्रदायाने नाराजी व्यक्त केली होती. 

वास्तविक संतविचाराला धारकऱ्यांची कार्यपद्धती अनुसरून नसल्याने हा धुडगुस असून त्यावर कारवाई व्हवी, यासाठी मागील वर्षी आणि या वर्षी देखील तक्रार करण्यात आली होती. पालकमंत्री गिरीष बापट यांच्या अध्यक्षतेखाली पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला होता. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी यांनी लेखी पत्राद्वारे कारवाईची मागणी केली होती. यावेळी पालकमंत्री बापट आणि उपायुक्त ज्योतिप्रियासिंग यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र काल रविवारी पालखी पुण्यात पोचल्यावर शेती महाविद्यालय ते डेक्कन कॉर्नर या मार्गात धारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यात नगाऱ्याच्यापुढे चालत घोषणाबाजी करत होते. "माउली माउली'चा गजर करत नव्हते. धारकऱ्यांच्यापुढे संताजी महाराज जगनाडे आणि त्यांच्यापुढे संत गवरशेठ वाणी आणि नंतर तुकाराम महाराजांची पालखी सोहळा होता. 

परंपरेप्रमाणे जगनाडे महाराजांच्या पालखी सोहळ्यानंतर माउलींचा सोहळा चालत असतो. मात्र मधेच धारकरी चालल्याने बाळासाहेब चोपदार यांनी धारकऱ्यांना "ओव्हरटेक' करून सोहळा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. 
यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी, "रांगेत चला. पुढे जावू नका. तुम्हाला इथेच थांबावे लागेल,' असे माउलींच्या सोहळ्यातील मानकऱ्यांना सुनावले. यावर पोलिसांच्या सूचनेनुसार बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार आणि राजाभाऊ चोपदार यांनी पालखी सोहळा थांबविण्याचा निर्णय घेतला. धारकरी डेक्कन कॉर्नरवरून बाजूला झाल्यानंतर सोहळा पुढे मार्गस्थ झाला. सुमारे पाऊण तास यामधे गेला. पावणे आठला पालखी डेक्कन कॉर्नरवरून पुढे मार्गस्थ झाली. 

शिव प्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांनी याबाबतच्या आरोपांचा इन्कार केला. ते म्हणाले, ""प्रतिष्ठानचे तीन ते चार हजार कार्यकर्ते वारीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून सहभागी होतात. शक्ती आणि भक्ती यांचा संगम म्हणून या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यात सहभागी होतात. छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज हे ज्या प्रमाणे या पालखी सोहळ्यात सहभागी होत होते, त्याचेच अनुकरण आमचे कार्यकर्ते करत आहेत. काल संचेती पुलाजवळ तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर त्या पालखीचे पूजन भिडे गुरूजींच्या हस्ते करण्यात आले. पालखी रथावर गुरूजी काही वेळ बसले होते. आमच्या पथकात तलवार घेतलेले तीन-चार तरुणांचे शस्त्रधारी पथक सहभागी असते. मात्र पोलिसांनी विनंती केल्यानंतर या वर्षीपासून तलवारीही आम्ही नेल्या नव्हत्या. त्या पाठोपाठ मशालपथक असते. ते देखील यंद नव्हते. तरीही तलवारी नाचवल्याबद्दलच्या तक्रारी झाल्याचे आश्‍चर्य वाटते.'' 

ते म्हणाले, ""पालखी सोहळ्याच्या पदाधिकाऱ्यांना विचारूनच या वारीत आम्ही सहभागी झालो होतो. तुकाराम महाराजांची पालखी संचेती पूल ओलांडून गेल्यानंतर त्या मागे सहभागी व्हा, अशी सूचना या पदाधिकाऱ्यांनीच दिली होती. त्यानुसारच आम्ही सहभागी झालो होतो. आम्ही संभाजी महाराजांचा पुतळा आल्यानंतर पालखी सोहळ्यातून दूर झालो. त्यानंतर हा वाद झाल्याचे समजते. याबाबत आम्ही त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधू आणि ते देतील त्या स्थानावरून पालखी सोहळ्यात सहभागी होऊ. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शिस्तबद्ध असल्याने त्यांच्याकडून सोहळ्याला गालबोट लागेल, असे वर्तन कधीही होणार नाही. पालखी सोहळ्यातून दूर झाल्यानंतर गुरूजींची सभा झाली. त्यात त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी वारीत का सहभागी व्हावे, याबाद्दल मार्गदर्शन केले. सा सभेत विनापरवाना लाऊडस्पीकरचा वापर केल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याचे समजते आहे.''

संबंधित लेख