palghar politics | Sarkarnama

माजी आमदार पंडित, पालघर जि. प. सीईओंमधील वाद चिघळला 

सुचिता रहाटे
बुधवार, 3 मे 2017

मुंबई : पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यासोबत अश्‍लील वर्तणूक आणि जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केलाच्या आरोपाखाली माजी आमदार व श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांना झालेल्या अटकेनंतर वसई परिसरात उत्स्फूर्तपणे बंद पुकारण्यात आला होता. 

मुंबई : पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यासोबत अश्‍लील वर्तणूक आणि जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केलाच्या आरोपाखाली माजी आमदार व श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांना झालेल्या अटकेनंतर वसई परिसरात उत्स्फूर्तपणे बंद पुकारण्यात आला होता. 

खोट्या आरोपाखाली झालेल्या कारवाईचा निषेध म्हणून विवेक पंडित यांनी जामीन नाकारण्याचा निर्णय घेतल्यावर पोलिस प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. पालघरचे सीईओ निधी चौधरी आणि पंडित यांच्यातील वाद चिघळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान अत्याचार किंवा अश्‍लील वर्तन घडलेले नव्हते, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक गोयल यांनी दिली आहे. 

पालघर जिल्ह्यातील कुपोषण, पोषण आहार व अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांच्या संदर्भात श्रमजीवी संघटनेने मागील आठवड्यात डोहाळे मोर्चा आंदोलन केले होते. संबंधित आंदोलनाची माहिती शासकीय यंत्रणेला कळविले होते. श्रमजीवी शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या कडून लेखी उत्तराची मागणी केली. सीईओ आपल्या वाहनातून जात असताना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निधी चौधरी यांचे वाहन अडवून आपली मागणी त्यांच्यासमोर कायम राखली. राज्य शासनाची महिला समितीला भेटण्यासाठी जाताना मला माझ्या शासकीय कामापासून रोखण्यात आल्याने निधी चौधरी यांनी आमदार विवेक पंडित व श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला. 

न्यायालयासमोर आमदार विवेक पंडित व अटक कार्यकर्त्यांना उभे केले असता त्यांनी जामीन घेण्याचा नाकारल्याने त्यांची ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आली. पंडित यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचे पडसाद वसई परिसरात उमटले. दुकानदारांनी उस्फूर्तपणे बंद पाळला. 

अत्यंत निकृष्ट आणि खाण्यालायक नसलेले पूरक पोषक आहार पुरवठा बंद करावा, अंगणवाडी सेविकांच्या इतर प्रश्नांबाबत श्रमजीवी कामगार संघटनेने आंदोलन केले होते. जिल्हा परिषदेसमोर डोहाळे जेवण कार्यक्रम करून निकृष्ट दर्जाचे लाडू मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना दिले. यानंतर तब्बल चार तास झालेल्या चर्चेनंतरही निधी चौधरी यांनी उत्तर न देता पळ काढण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलन चिघळले. श्रमजीवी चे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने अखेर सीईओ चौधरी यांनी माघारी येऊन लेखी उत्तर दिल्यानंतर आंदोलकांनी त्यांना जाऊन दिले. दरम्यान श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांची पोलिस व सीईओ निधी चौधरी यांच्याशी झटापट झाली होती. 

माझ्या कार्यकर्त्यांनी लोकहिताच्या प्रश्नावर आंदोलन केले, लोकांचे प्रश्न सुटावेत, बालकांना सकस पोषक आहार मिळावा, कुपोषित बालकांना सेवा देणाऱ्या अंगणवाडी भगिनींना मानधन मिळावे यासाठी राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार आंदोलन केले आणि त्यासाठी जाब विचारला तर माझे काय चुकले असे, आमदार विवेक पंडित म्हणाले. प्रशासनाच्या मनमानीवर जनतेचा अंकुश राहणे लोकशाहीला अभिप्रेत आहे. स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकविण्यासाठी आम्हाला अशी कितीही आंदोलनं करावी लागली आणि कितीही वेळा तुरुंगवास भोगावा लागला तर आमची तयारी असल्याची भूमिका विवेक पंडित यांनी मांडली होती. 

पूर्ण प्रकरणात माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी सीईओ चौधरी किंवा कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करताना मला पोलिसांनी किंवा तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना आढळले नाही. चौधरी यांनी सोशल मीडियावर या आंदोलनाची तुलना "द्रौपदीच्या वस्त्रहरणाशी" केली आहे. माझा प्रश्न आहे की कोणाचे वस्त्रहरण कोणी केले हे जाहीर करावे. ज्याने त्यांची साडी फाडली असेल व हात टाकला असेल तर त्याचे हात सही कलम करण्यासही संघटना मागे हटणार नाही आणि हे माझ्या कार्यकर्त्यांनी केले असल्याचे पुरावा निधी चौधरी यांनी दिला तर मी स्वतः संघटना बंद करेन असे स्पष्ट करत पंडित यांनी चौधरी यांना आव्हान दिले आहे त्यामुळे चौधरी आणि पंडित यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्‍यता आहे. 

"एफआयआर'मध्ये कुठल्याही पद्धतीचा अत्याचार, अश्‍लील, बोलल्याचे तसेच अत्याचार झाला असल्याचे नमूद नसून त्याची कोणत्याही प्रकारची नोंद नाही असे पालघर पोलिस उपअधीक्षक गोयल यांनी स्पष्ट केले. 
 

संबंधित लेख