पालघर पोटनिवडणुकीत `व्हीव्हीपीएटी'ने उडवली प्रशासनाची तारांबळ 

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानाच्या दिवशी, सोमवारी (ता. 28) तापमानातील पारा तब्बल 35 अंश सेल्सिअसवर गेल्याने मतदार हैराण झाले. त्याच वेळी व्हीव्हीपीएटी मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने मतदान यंत्रांत फेरफार केल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होऊ लागला आहे.
पालघर पोटनिवडणुकीत `व्हीव्हीपीएटी'ने उडवली प्रशासनाची तारांबळ 

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानाच्या दिवशी, सोमवारी (ता. 28) तापमानातील पारा तब्बल 35 अंश सेल्सिअसवर गेल्याने मतदार हैराण झाले. त्याच वेळी व्हीव्हीपीएटी मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने मतदान यंत्रांत फेरफार केल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होऊ लागला आहे. 

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले. अनेक ठिकाणी मतदान यंत्रांत तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास येऊ लागले. दुरुस्ती शक्‍य नसल्याने पर्यायी मतदान यंत्रे देण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदान सुरू होण्यास तास-दोन तास विलंब झाला. परिणामी अनेक ठिकाणी मतदार नाराज होऊन घरी परतले, असे सांगण्यात आले. 

पालघर मतदारसंघात दुपारपर्यंत 154 मतदान यंत्रांत तांत्रिक बिघाड झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. 

व्हीव्हीपीएटी मशीनमधील सेन्सरमध्ये सूर्यप्रकाश, उष्णता व धुळीमुळे बिघाड होऊ शकतो. म्हणून काळजी घेण्याची सूचना देण्यात आली होती. या यंत्रांचा प्रथमच वापर होत असल्याने तांत्रिक अडचणी येतील, असे गृहित धरून 15 टक्के अतिरिक्त मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे 96 तंत्रज्ञ ठिकठिकाणी नेमण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली. तथापि काही ठिकाणी मतदान सुरू होण्यास विलंब झाल्याचे त्यांनी मान्य केले. 

मतदान सुरू होण्यात झालेल्या विलंबाबाबत झोनल ऑफिस आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अहवाल मागवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून आवश्‍यकता भासल्यास मतदानाची वेळ वाढवण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. व्हीव्हीपीएटी मशीन हाताळण्यात प्रशासन सक्षम असल्याचा दावा त्यांनी केला. 

मतदारांत गोंधळ 
बहुतेक ठिकाणी सकाळपासूनच मतदारांत निरुत्साह असल्याचे दिसले. अनेक मतदान केंद्रांत शुकशुकाट होता. काही ठिकाणी मतदार चिठ्ठ्याच न पोहोचल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला. ठिकठिकाणी उभारलेल्या सहायता केंद्रांमधून कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नसल्याने मतदार घरी परत गेल्याचे समजते. अनेक ठिकाणी मोबाईलवरून मतदार शोधण्याचे काम सुरू होते. 

रेल्वेने रडवले 
पालघर पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी आज पहाटे विरारहून डहाणू रोडसाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार होती. वैतरणा ते सफाळे स्थानकांदरम्यान दुरुस्तीसाठी काल रात्री मेगा ब्लॉक घेण्यात आला. या कामादरम्यान यंत्रसामग्रीत बिघाड झाल्याने विरारहून निघणाऱ्या गाड्या दोन तास अडकून पडल्या. 

पालघरला पहाटे 4.40 वाजता पोहोचणारी "मेमू' गाडी 6.30 वाजता पोहोचली. त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना धावपळ करून खासगी वाहनांतून मतदान केंद्र गाठावे लागले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com