पालघरबाबत भाजपच्या कोअर कमिटीमध्ये प्राथमिक चर्चा : खासदार कपिल पाटील

पालघर पोटनिवडणुकीच्या विषयावर कोअर कमिटीमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे आपल्याला समजले, असेही ते म्हणाले.
पालघरबाबत भाजपच्या कोअर कमिटीमध्ये प्राथमिक चर्चा : खासदार कपिल पाटील

पालघर : खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली आहे. या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्याची जबाबदारी भाजपच्या राज्य कोअर कमिटीची आहे, असे पक्षाचे ठाणे-पालघर विभागीय अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.
 
खासदार चिंतामण वनगा यांच्या कवाडा या मूळगावी झालेल्या शोकसभेनंतर सफाळे येथे एका कार्यक्रमाला जात असताना खासदार कपिल पाटील यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्या वेळी पत्रकारांनी दिवंगत वनगा यांच्या उत्तराधिकाऱ्यांबाबत विचारणा केली असता ते बोलत होते. 

वनगा यांचे ज्येष्ठ पुत्र श्रीनिवास यांचे नावे कुटुंबीयांनी पुढे केले असल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर आले आहे. याबाबत खासदार पाटील यांनी वक्‍तव्य करण्याचे टाळले. 

दिवंगत वनगा यांच्या कुटुंबीयांच्या भावना आणि स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा; तसेच पोटनिवडणुकी संदर्भातील माहिती राज्याच्या कोअर कमिटीला कळवली जाईल. निवडणूक घोषित झाल्यानंतर राज्य पातळीवर निर्णय घातला जाईल, असे त्यांनी सांगितले. 

पालघर पोटनिवडणुकीच्या विषयावर कोअर कमिटीमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे आपल्याला समजले, असेही ते म्हणाले. 

खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी पक्ष घेईल, अशी ग्वाही शोकसभेत दिल्याचा खासदार पाटील यांनी उल्लेख केला. 

तलासरीतील शोकसभेला उपस्थिती कमी राहावी, यासाठी काही स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केला, असे बोलले जात होते. त्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. 

भाजपमध्ये घराणेशाही चालत नाही, असे ते म्हणाले; परंतु पदवीधर मतदारसंघासाठी आपल्या मुलाला उमेदवारी देण्यात आली, तर ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवू, असे त्यांनी सूचित केले. 

"समस्या सोडवण्याचा प्रयत्न' 
खासदार चिंतामण वनगा यांनी पक्ष वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्या निधनामुळे या भागात पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षाचा विस्तार आणि मजबुतीकरणासाठी लक्ष देण्याची विनंती अनेक कार्यकर्त्यांनी आपल्याला केली आहे, असे खासदार पाटील म्हणाले. आगामी काळात पालघर जिल्ह्यातील पक्षवाढीसाठी; तसेच या भागातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com