चिंतामण वनगा हे आदिवासी राजा होते : खासदार कपिल पाटील

पालघरचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांना मूळ गावी कवाडा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
चिंतामण वनगा हे आदिवासी राजा होते : खासदार कपिल पाटील

तलासरी : पालघरचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांना मूळ गावी कवाडा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

या वेळी आदिवासी विकासमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार पास्कल धनारे, वर्षा ठाकूर, माजी मंत्री जगनाथ पाटील, वनगा यांच्या पत्नी, मुले श्रीनिवास, प्रफुल्ल व सुना आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते. 

कवाडा येथे रविवारी (ता. 11) झालेल्या शोकसभेला पालघर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, भाजप कार्यकर्ते, नगराध्यक्ष, सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

महाविद्यालयीन जीवन आणि राजकीय कारकिर्दीत आम्ही 45 वर्षे एकत्र काम केले; मात्र कधीच वादविवाद झाले नाहीत. वनगा यांनी विधानसभा आणि लोकसभेत सर्वांना सोबत घेऊन काम केले, अशी श्रद्धांजली सवरा यांनी वाहिली. 

समाजातील प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबातील आहे, असे ते म्हणायचे. लोकांशी समरस होणारा उत्कृष्ट संसदपटू आणि सभागृहाची प्रतिष्ठा वाढवणारा ज्येष्ठ सहकारी आणि मित्र आज आपल्यात नाही. परंतु त्यांनी केलेले कार्य, ठेवलेला सुसंवाद, स्नेह जतन करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल, असे सवरा म्हणाले. 

खासदार कपिल पाटील म्हणाले, की चिंतामण वनगा हे आदिवासी राजा होते. त्यांचा स्वभाव दिलदार होता. ते कधीही, कुणालाही नाराज करत नसत. ग्रामीण भागात काम करताना ते प्रत्येकाला मार्गदर्शन करत असत. आमदार असताना त्यांनी आदिवासी भागात केंद्रातील योजना राबवण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांनी आदिवासी समाजाचे प्रश्‍न पंतप्रधानांसमोर मांडून सोडवण्याचा प्रयत्न केला. वनगा यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्‍यता आहे. भाजपने या जागेसाठी वनगा कुटुंबातील सदस्याला उमेदवारी द्यावी. त्यांना बिनविरोध निवडून आणण्याचे प्रयत्न कार्यकर्त्यांनी करावे, अशी अपेक्षा शोकसभेत व्यक्त करण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com