प्रतिस्पर्ध्यांशी आक्रमकतेने भिडा : मुख्यमंत्री 

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना व बहुजन विकास आघाडीविरोधात आक्रमकतेतून भिडण्याचा संदेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला असून, साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर करून कोणत्याही परिस्थितीत विजयश्री मिळविण्याचा प्रयत्न करा, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
प्रतिस्पर्ध्यांशी आक्रमकतेने भिडा : मुख्यमंत्री 

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना व बहुजन विकास आघाडीविरोधात आक्रमकतेतून भिडण्याचा संदेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला असून, साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर करून कोणत्याही परिस्थितीत विजयश्री मिळविण्याचा प्रयत्न करा, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. 

राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ कासा व नालासोपारा येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा संदेश भाषणातून दिला होता. या भाषणाच्या काही क्‍लिप्स भाजप कार्यकर्त्यांना व्हॉट्‌सअप आणि अन्य सोशल साईटच्या माध्यमातून पाठविल्या जात आहेत. 

या संदेशांमधून मुख्यमंत्र्यांनी शिवसेना व बहुजन विकास आघाडीवर थेट हल्ला केला असून, दोन्ही पक्षांची खिल्ली उडवत सत्ताधाऱ्यांच्या दहशतीला घाबरू नये, असे आवाहनही केले आहे. त्यामुळे पालघरची पोटनिवडणूक भाजपने अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची केली आहे. 

विश्‍वासघात करणाऱ्या पक्षांना आता "अरे ला कारे' या पद्धतीने प्रतिसाद देण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 

कार्यकर्त्यांच्या मदतीला नेत्यांची फौज 
भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, राज पुरोहित, आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय केळकर, आमदार मंगल प्रभा लोढा 15 दिवसांपासून पालघर जिल्ह्यात ठाण मांडून बसले आहेत. 

त्याचप्रमाणे मुंबई-ठाण्याचे नगरसेवकही जिल्ह्यात ठिकठिकाणी पोहोचले असून, घरोघरी जाऊन प्रचार करणे, निवडणुकीच्या दिवशी मतदारांना प्रत्यक्षपणे मतदानासाठी काढणे व इतर प्रतिस्पर्धी पक्षांवर अंकुश ठेवण्याचे काम हे नेते करणार आहेत. 

निवडणुकीमधील रंगत वाढली 
शिवसेनेने ही लढाई प्रतिष्ठेची केली असून, भाजपविरुद्ध शिवसेना एवढ्यापुरतीच ही निवडणूक मर्यादित न राहता मुख्यमंत्री विरुद्ध एकनाथ शिंदे असे स्वरूप आले आहे. भाजपने जाहीर सभा, आमदार-खासदारांचे दौरे व विविध पक्षांतील कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशावर जोर दिला असून, बहुजन विकास आघाडी व शिवसेनेने आपआपल्या प्राबल्याच्या क्षेत्रामध्ये घरोघरी जाऊन स्थानिक नेत्यांशी चर्चा करून मतदारांशी थेट संपर्क करण्यावर भर दिला आहे. तर दुसरीकडे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात पिछाडीवर असलेल्या कॉंग्रेसनेही मरगळ झटकून प्रचारामध्ये झोकून दिल्याने निवडणुकीमधील रंगत वाढली आहे. 

मूळ समस्यांना बगल 
या निवडणुकीत दिवंगत वनगा यांच्या कुटुंबीयांकडे झालेले दुर्लक्ष, उमेदवारांची पळवापळवी व इतर राजकीय मुद्द्यांवर चर्चा आरोप-प्रत्यारोप रंगत आहे. नव्याने झालेल्या पालघर जिल्ह्याचा विकास या भागातील कुपोषण, आरोग्य, शिक्षण, पाणी टंचाईसारख्या समस्या; त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाचा विकास, उपनगरी प्रवाशांच्या समस्या होऊ पाहणारे बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्ग, वाढवण-जिंदाल बंदर यांसारख्या विषयांवर मात्र प्रमुख राजकीय पक्षांनी मौन बाळगले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com