pakistan assembly election 2018 | Sarkarnama

पाकिस्तानात 25 जुलैला सार्वत्रिक निवडणूक; लढत उत्कंठावर्धक! 

अभय सुपेकर 
सोमवार, 23 जुलै 2018

पाकिस्तानात 25 जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. भारताचा शेजारी असलेल्या या देशातील निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. 26 किंवा 27 तारखेला कौल स्पष्ट होईल. 

पाकिस्तानात 25 जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. भारताचा शेजारी असलेल्या या देशातील निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. 26 किंवा 27 तारखेला कौल स्पष्ट होईल. 

- पाकिस्तान नॅशनल असेंब्लीच्या एकूण जागा - 342 
- थेट निवडणुकीद्वारे भरल्या जाणाऱ्या जागा - 272 
- महिलांसाठी राखीव जागा - 60, 
(यापैकी राज्यनिहाय जागा - पंजाब - 33, सिंध - 14, खैबर पख्तुनख्वा - 9, बलुचिस्तान - 4), 
- धार्मिक अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा - 10 
- बहुमताचा आकडा - 172 

- जनरल असेंब्लीसाठी पक्षाला मिळालेल्या जागांच्या तुलनेत त्या पक्षाला महिला प्रतिनिधींसाठीच्या जागा वाट्याला येतात. त्याचे सूत्र असे - एकूण जागा 272 भागिले 60. थोडक्‍यात पक्षाला मिळालेल्या 4.5 जागांमागे एक जागा मिळते. याकरिता पक्षांना महिलांची क्रमवारी ठरवत त्यांची यादी सादर करावी लागते. त्या आधारे महिलांना प्रतिनिधित्व मिळते. 
- अल्पसंख्याकांकरिता जागा वाटपासाठी 272 जागा भागिले 10 म्हणजे, 27.2 जागांमागे एक धार्मिक अल्पसंख्याक जागा असते. 

सत्ताधारी पीएमएल-एन 
पाकिस्तानात मे 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत पाकिस्तान मुस्लिम लिग (नवाज) (पीएमएल-एन) पक्षाने 342 पैकी 166 जागा पटकावल्या. त्यांना सत्तेवर येण्यासाठी 172 जागा आवश्‍यक होत्या. तेव्हा 19 अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. जुलै 2017 मध्ये पनामा पेपर्स प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर शरीफ यांनी पदत्याग केला. शरीफ यांच्या जागी शाहीद खकान अब्बासी ऑगस्ट 2017 मध्ये पाकिस्तानचे आठरावे पंतप्रधान झाले. कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी 31 मे रोजी अंतरिम सरकारकडे सूत्रे दिली. सध्या माजी सरन्यायाधीश नसीर उल मुल्क अंतरिम पंतप्रधान आहेत. 

इम्रान खान यांचे आव्हान 
पाकिस्तानचा क्रिकेटपटू आणि राजकारणी झालेले इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे आव्हान नवाज शरीफ यांच्या पक्षासमोर आहे. भ्रष्टाचाऱ्यांवर आसूड आणि गरिबांच्या जीवनात परिवर्तनाचा नारा देणाऱ्या खान यांच्या पक्षामागे 24 टक्के जनमत आहे, असा अंदाज आहे. भारताबाबत त्यांची भूमिका कडवट आहे. काश्‍मीरचा प्रश्‍न आणि प्रत्येक काश्‍मिरीची व्यथा आपण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडू, असे ते वारंवार सांगताहेत. 

शहबाज यांच्यासमोर अडचणींचा डोंगर 
पीएमएल-एनचा विचार करता, नवाज शरीफ तुरुंगात असल्याने त्यांचे बंधू, पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांच्याकडे पक्षाची सूत्रे आहेत. पक्षांतराचा वेग, शरीफ तुरुंगात असल्याने त्यांची भासणारी उणीव, अपात्रता आणि अंधकारमय भवितव्य यामुळे शहबाज यांच्यासमोर आव्हाने आहेत. नॅशनल असेंब्लीचे सदस्य राहिलेल्या पक्षातील 15 जणांनी पक्षांतर केले असून, यातील बहुतांश जण खान यांच्या तंबूत दाखल झाले आहेत. आज तरी शरीफ यांच्या पक्षाची स्थिती मजबूत वाटत आहे. 

पीपीपी काश्‍मीरबाबत आक्रमक 
डाव्या बाजूला झुकलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे बिलावल भुट्टो झरदारी हे तिसरे नेते पाकिस्तानच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आई, माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा वारसा जसा बिलावलना आहे, तसाच वारसा माजी पंतप्रधान असीफ अली झरदारी यांचा आहे. आईचा वारसा चालवणाऱ्या बिलाल यांची स्वच्छ प्रतिमा, तरुण चेहेरा ही त्यांची जमेची बाजू आहे. जनमताच्या कौलात 17 टक्के मतदार "पीपीपी'च्या पाठीशी आहेत, असा अंदाज सांगतो. काश्‍मीरवर पाकिस्तानचा हक्क असल्याची भाषा ते करतात. 

 

संबंधित लेख