मोदीसाहेब, हुतात्मा जवानांच्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला ! 

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री संसदेत एकदा म्हणाले होते, की कदाचित माझी उंची कमी आणि नम्र असल्यामुळे लोकांना वाटत असावे की मी कणखर होऊ शकत नाही. जरी मी शारीरिकदृष्ट्या धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवतही नाही.'' शास्त्रीजींची छाती 56 इंचांची नव्हती पण, त्यांनी पाकला धडा शिकविला. तसाच धडा पुन्हा एकदा शिकविण्याची वेळ आली आहे. म्हणूनच भारत मातेसाठी हुतात्मा झालेल्या जवानांच्या रक्ताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येकाने शपथ घातली पाहिजे. दहशतवाद्यांचा खात्मा हेच लक्ष्य हवे !
मोदीसाहेब, हुतात्मा जवानांच्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला ! 

जम्मू-काश्‍मिरात दहशतवाद्यांचा जो नंगानाच सुरू आहे, तो आणखी किती दिवस सहन करायचा. सहनशीलतेलाही काही मर्यादा असतात. भारताची सहनशीलता संपली आहे. पुलवामात काल दहशतवाद्यांनी चाळीस जवानांची हत्या करून भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला चढविला आहे. या भ्याड हल्ल्याने भारतातील प्रत्येक राष्ट्रभक्त माणूस पेटून उठला. प्रत्येकाच्या मुखात एकच शब्द आहे. सर्वांची एकमुखाने मागणी आहे ती म्हणजे, ""पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा !'' 

अजून किती दिवस आपली राखरांगोळी करून घ्यायची. आणखी किती दिवस पाक पंतप्रधानांना मिठ्या मारायच्या. भारताच्या लोकशाही आदर्शाच्या गप्पा जगाला आणखी किती वर्षे सांगायचा. ज्या लालबहादूर शास्त्रींनी "जय जवान, जय किसान'चा नारा दिला, त्या वेळी प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली होती आणि छाती गर्वाने फुगली होती. आज सीमेवर आपले जवान रक्त सांडत आहेत. दररोज दोन, चार जवान देशासाठी हुतात्मा होत आहेत. देशातील अन्नदाता शेतकरी सुखी नाही. अंगात बळ नसल्याने तो लढण्याऐवजी गळ्याभोवती फास आवळून घेतोय. जर जवान आणि किसान सुखी नसेल, सुरक्षित नसेल तर या देशाचे काही खरे नाही, असे खेदाने म्हणावे लागेल. 

खरंतर कालच्या हल्ल्याने संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरला. जम्मू-काश्‍मिरात हल्ले सुरूच आहेत. शापित नंदनवन धुमसते आहे; तर दुसरीकडे कुठे मुंबईवर हल्ला होतो, तर कधी संसदच बॉंब हल्ल्याने उडविण्याचा प्रयत्न होतो. जवानांबरोबर निरपराध नागरिक आपला जीव गमावत आहेत. आणखी किती जीव पाकिस्तानला द्यायचे. किती हल्ले पचवायचे. भारत कधी जशास तसे उत्तर देणार ! 

प्रत्येक पंतप्रधान पाकिस्तानला कायमचा धडा शिकविण्याची भाषा करतो. जवानांचे बलिदान वाया जाणार नाही असा, निर्धार करतात. त्यांचे हे शब्द आम्हा भारतीयांना क्षणभर सुखावतात. अंगात थोडं हत्तीचं बळ येते. पण, आठवडा दोन आठवडे गेले की सगळं विसरले जाते. चर्चेची गुऱ्हाळे सुरू होतात. महिना पंधरा दिवसही होत नाहीत तोवर नवीन हल्ला होतो. पुन्हा दोन चार जवान हुतात्मा होतात. ही मालिका अजूनही थांबली नाही. ती कधी थांबेल सांगता येत. गोळीला गोळीनेच उत्तर देण्याची गरज आहे, असे माजी पोलिस महासंचालक जे. एफ. रिबेरो हे सांगत होते. पण, लक्षात कोण घेतो. 

युद्ध कोणत्याही देशाला परवडत नाही. "युद्धापेक्षा बुद्ध' हवा हे खरे आहे. युद्धाने देश किती वर्षे मागे जातो. आर्थिक घडी बिघडते. देशासाठी लढताना जवानांना जिवाची बाजी लावावी लागते हे खरे असले तरी सहनशीलतेचा अंतही होता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाती 56 इंचांची आहे. त्यांनी या भारदस्त छातीवर हात ठेवून देशाला सांगितले पाहिजे,""मी हुतात्मा जवानांच्या रक्ताची शपथ घेतो, की दुश्‍मनांना धडा शिकवीन !'' केवळ किंमत वाया जाणार नाही, अशा पोकळ घोषणा देऊ नयेत. बराक ओबामा यांनी पाकिस्तानाच घुसून जसा लादेनचा खात्मा केला तसा जैशचा खात्मा करून जोश केला पाहिजे. तशी हिम्मत दाखविली पाहिजे. 

स्वातंत्र्योत्तर काळात देशाला दोन असे पंतप्रधान लाभले की त्यांचे सूर्य-चंद्र असेपर्यंत नाव घेतले जाईल. ते म्हणजे लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी. शास्त्री यांनी 1965 च्या युद्धात पाकिस्तानची अगदी धुळदाण उडविली होती. बलाढ्य देशांनी मध्यस्थी केली नसती तर पाकिस्तानला कमी उंचीच्या या पंतप्रधानाने कायमचा धडा शिकविला असता. भारताचा नाद केला की काय होते हे आपल्या खणकर नेतृत्वाने त्यांनी दाखवून दिले होते. देशातील प्रत्येक जवान आणि शेतकऱ्याविषयी त्यांना खूप आदर वाटत असे. म्हणूनच त्यांनी "जय जवान, जय किसान'चा नारा दिला. किती शक्ती होती या दहा शब्दांत! भारतीयांच्या नसानसात राष्ट्रभक्तीची ज्योत त्यांनी पेटविली. 

संसदेत बोलताना एकदा लालबहादूर शास्त्री म्हणाले, ""कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे तसेच नम्र असल्यामुळे लोकांना वाटत असावं की मी कणखर होऊ शकत नाही. जरी मी शारीरिकदृष्ट्या धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवतही नाही.'' शास्त्रीजींची छाती 56 इंचांची नव्हती, पण "त्यांची मूर्ती छोटी आणि कीर्ती मोठी होती. पाकिस्तानला त्यांनी शिकविलेला धडा आम्ही कधीच विसरू शकत नाही. 

शास्त्रीजींनी पेटविलेली मशाल आजही विझलेली नाही. ती जवानांच्या रुपाने धगधगत असते. जे शास्त्रींचे तेच इंदिरा गांधींचे. नवदुर्गेचा अवतार धारण करून या कणखर महिला पंतप्रधानानेही पाकिस्तानला 1971 च्या युद्धात धडा शिकविला. त्या हयात असेपर्यंत पाकिस्तानने कधी भारताची कुरापत काढण्याची हिंमत दाखविली नाही. 


जम्मू-काश्‍मीरसह देशात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांचा नंगानाच सुरू आहे. आतापर्यंत हजारो भारतीयांचे प्राण घेतले आहेत. सीमेवर मातृभूमीसाठी डोळ्यात तेल घालून लढणारा एखादा जवान जेव्हा हुतात्मा होतो तेव्हा त्याच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळतो. मुलांचे पितृत्वाचे छत्र हिरावते. आई-वडिलांच्या एका डोळ्यात आनंदाचे तर दुसऱ्या डोळ्यात दु:खाचे अश्रू असतात. सरकार पैसे, पेन्शन, मेडल देते, हे खरे आहे. मात्र, देशासाठी आहुती देणारा पोटचा गोळा गेल्यानंतरचे दु:ख ते कसे पचवितात. कोठून येतेही ही शक्ती ! हे कळत नाही. 

सीमेवर आपले चाळीस, पन्नास सहकारी डोळ्यादेखत अखेरचा श्‍वास घेतात. रक्ताच्या थोरोळ्यात पडलेले असतानाही दुसरे जवान तितक्‍याच प्राणपणाने मातृभूमीच्या रक्षणासाठी लढतात. चाळीस काय चार लाख जवानही देशासाठी आपल्या जीवनाची आहुती देण्यास सज्ज असतात. भारतीय लष्कराचा म्हणून दिवंगत लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांना अभिमान वाटत असे. ते म्हणत, ""पाकिस्तानच काय जगात कोणाशीही लढण्याची, दोन हात करण्याची ताकद आमच्या सैन्यात आहे.'' 

आमचा देश शांतताप्रिय आहे. आमच्या लोकशाहीने जी काही आदर्शमूल्ये जपली आहेत, त्याचे नक्कीच समाधान आहे. याचा अर्थ भारत डरफोक नाही. भारताला जर कोणी डिवचत असेल, आमचे रक्त सांडत असेल तर ते आम्ही कदापि चालू देणार नाही. यापुढे भारताच्या सीमेवर रक्ताचे पाट वाहतील, पण ते रक्त आमच्या जवानांचे नसेल, तर शत्रू राष्ट्राचे असेल, दहशतवाद्यांचे असेल. आम्ही अहिंसेचे पुजारीच आहोत. म्हणून आम्ही नेभळट नाही. भारत मातेसाठी हुतात्मा झालेल्या जवानांची म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक भारतीयाने शपथ घातली पाहिजे की, दहशतवाद्यांचा खात्मा हेच लक्ष्य ! रणगाड्यांच्या तोफी देशद्रोह्यांना उडविण्याचीच वेळ येऊन ठेपली आहे. त्या क्षणाचीच प्रत्येक भारतीय प्रतीक्षा करतो आहे. 

आज सीमेवर जवान देशाचे रक्षण करतात म्हणून आम्ही शांतपणे झोप घेतो. कोंढाणा किल्ल्यासाठी नरवीर तानाजी छातीचा कोट करून प्राणपणाने लढले. तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणेच प्रत्येक जवान सीमेवर तसाच छातीचा कोट करून लढत आहे. पण, आणखी किती दिवस ही मोगलाई सहन करायची ! हीच चिंता आहे मोदीसाहेब आम्हा भारतीयांना ! 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com