मला हटवण्यामागे स्मृती इराणीच - पहलाज निहलानी

मला हटवण्यामागे स्मृती इराणीच - पहलाज निहलानी

मुंबई : सेन्सॉर मंडळाच्या अध्यक्षपदावरून काम करत असताना सतत वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक पहलाज निहलानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, आपल्याला अध्यक्षपदावरून हटवण्यामागे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. 
केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचे (सीबीएफसी) अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या उचलबांगडीनंतर अनेकांना दिलासा मिळाला. 

निहलानी यांच्या जागी आलेल्या प्रसून जोशी यांच्या नियुक्तीचं सर्वांनी स्वागतदेखील केलं आहे. निहलानी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये बरेच खुलासे केले. नुकतंच युट्यूब चॅनेल "लेहरे टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी "इंदू सरकार' चित्रपटाबाबत गौप्यस्फोट केलाय. आपलं अध्यक्षपद जाण्यामागे राज्यवर्धन सिंग राठोड, अनुराग कश्‍यप आणि एकता कपूर यांना त्यांनी जबाबदार मानलं होतं. यामध्ये आता भर पडलीय ते म्हणजे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांची. 

या मुलाखतीत निहलानी म्हणाले की, स्मृती इराणींनी माहिती व प्रसारण मंत्री म्हणून कामकाज स्वीकारलं तेव्हा "इंदू सरकार' चित्रपटावरून वाद सुरू होता. स्मृती इराणींना त्यांचं वर्चस्व दाखवायचं होतं आणि माध्यमांमध्ये मी वादग्रस्त ठरल्यामुळे माझं पद काढून घेण्यासाठी फार वेळ लागला नाही. मी "इंदू सरकार ' कोणत्याही कटशिवाय प्रदर्शित होऊ देत नव्हतो म्हणून त्यांच्या निशाण्यावर होतो. याच कारणामुळे माझी उचलबांगडी करण्यात आली. 

या मुलाखतीत निहलानी यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला. "उडता पंजाब' चित्रपटाला मान्यता देऊ नका असं मला सरकारकडून सांगण्यात आलं होतं, हे त्यांनी स्पष्ट केलं. चित्रपटाला मान्यता न देण्यासाठी अनेकांकडून माझ्यावर दबाव होता. मीसुद्धा या इंडस्ट्रीमधला आहे. मला जे योग्य वाटलं आणि नियमांनुसार मी आवश्‍यक ते कट सांगितले आणि चित्रपटाला मान्यता दिली. 

इतकंच नव्हे तर "बजरंगी भाईजान' हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ नये यासाठीही माझ्यावर दबाव होता. कायदा व सुव्यवस्थेचा विचार करुन हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ नये यासाठी मला गृह खात्याकडून पत्र मिळालं होतं. मात्र चित्रपटाच्या कथेविषयी मला माहिती असल्याने, प्रसारमाध्यमं आणि सरकारमध्ये त्याविषयी काही गैरसमज असल्याने मी पुढाकार घेतला आणि प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला. चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खान नेहमीच माझ्याविरोधात होता. माझ्याविरोधात त्यांनी अनेक वक्तव्ये केली, असं निहलानी म्हणाले. याशिवाय केंद्रीय माहिती व प्रसारण खात्यातील भ्रष्टाचाराबाबतही त्यांनी उघडपणे वाच्यता केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com