`एमआयडीसी`त वचक असलेल्या पाचुंदकर, जासूदांना दणका

`एमआयडीसी`त वचक असलेल्या पाचुंदकर, जासूदांना दणका

शिरूर : शिरूर तालुक्‍यातील सहा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी चुरशीने झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसने समान यश मिळविले. तीन ग्रामपंचायतींचे सरपंचपद भाजपने; तर तीन "राष्ट्रवादी' ने मिळविले. रांजणगाव गणपती, कर्डे व आंबळे येथे अनपेक्षित निकाल लागले. बहुतांश ग्रामपंचायतींत प्रस्थापितांना मतदारांनी घरी बसविल्याचे निकालातून दिसून आले.

तालुक्यातील धानोरे ग्रामपंचायतीची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली. उर्वरित सहा ग्रामपंचायतींसाठी काल चुरशीने मतदान झाले. आज जाहीर झालेल्या निकालातून बहुतांश सदस्यपदे "राष्ट्रवादी' च्या कार्यकर्त्यांकडे गेली असली; तरी सरपंचपदावर भाजप व राष्ट्रवादीने समान यश मिळविल्याचे स्पष्ट झाले.

रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर, विद्यमान सदस्या स्वाती पाचुंदकर व बाजार समितीचे संचालक मानसिंग पाचुंदकर यांच्या पॅनेलसमोर पंचायत समितीचे माजी उपसभापती आबासाहेब पाचुंदकर, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर व माजी सरपंच भिमाजी खेडकर यांच्या पॅनेलने कडवे आव्हान उभे केले होते. तरीही विकासकामांच्या व यंत्रणेच्या बळावर शेखर पाचुंदकरांचा पॅनेल प्रबळ मानला जात होता. स्वाती पाचुंदकर यांचे पती दत्तात्रेय पाचुंदकर व भिमाजी खेडकर यांचे पुतणे सर्जेराव खेडकर यांच्यात सरपंचपदासाठी तुल्यबळ लढत झाली. त्यात खेडकर यांनी निसटता विजय मिळवला. ग्रामपंचायतीवरही त्यांच्या पॅनेलचे बहुमत आले.

शेखर पाचुंदकर यांच्या पॅनेलवर घराणेशाहीचा आरोप झाला. "सर्व पदे यांच्याच घरात पाहिजेत का', अशी दबक्‍या आवाजात चर्चा होती. या दबलेल्या भावनेला जनतेने मतपेटीद्वारे वाट मोकळी करून दिली आणि "आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा' अशी राजकीय भावना बाळगणाऱ्या पाचुंदकरांना "दे धक्का' दिला. 

कर्डे व लंघेवाडी येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत प्रस्थापितांचे वर्चस्व मतदारांनी झुगारले. पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र जासूद यांना या परिसराचे अनभिषिक्त सम्राट मानले जाते. मात्र, मतदारांनी दोन्ही ठिकाणी सुनील इसवे व संतोष लंघे या भाजप विचारांच्या कार्यकर्त्यांना सरपंचपदाची संधी दिली. कर्ड्यात बहुमत राखण्यात "राष्ट्रवादी' ला यश आले; मात्र जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे यांच्या वॉर्डातच पक्षाला धक्का बसला. 

कळवंतवाडी व ढोकसांगवी येथील सरपंचपदावर "राष्ट्रवादी' ने निर्विवाद हक्क सांगितला. दादासाहेब चव्हाण या साध्या माणसाच्या गळ्यात कळवंतवाडीकरांनी विजयश्रीची माळ घातली; तर ढोकसांगवी येथेही अपेक्षेप्रमाणे "राष्ट्रवादी' प्रणीत पॅनेलच्या शोभा शेलार बहुमताने निवडून आल्या. 

आमदार पाचर्णे यांनाही सूचक इशारा

आमदार बाबूराव पाचर्णे यांचे स्वीय सहायक महेश बेंद्रे यांनी आंबळेच्या सरपंचपदासाठी मैदानात उतरून चांगली वातावरण निर्मीती केली होती. आमदारांच्या माध्यमातून मोठा निधी गावात आणून विकासकामेही केली होती. प्रत्यक्ष मतदानावेळी मात्र मतदारांनी त्यांना अव्हेरले. सोमनाथ बेंद्रे या "राष्ट्रवादी' च्या पदाधिकारी असलेल्या अनुभवी व्यक्तीच्या गळ्यात "विजयश्री' ची माळ घालताना मतदारांनी आमदारांनाही सूचक इशारा दिल्याचे मानले जाते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com