pacharne campaign for adhalrao | Sarkarnama

आढळरावांना पूर्व हवेलीतून गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त लीड भेटणार : पाचर्णे

जनार्दन दांडगे
सोमवार, 15 एप्रिल 2019

लोणी काळभोर ः थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना चालू होऊ नये, यासाठी पडद्यामागून कोण प्रयत्न करते, याची माहिती ऊस उत्पादकांना व पूर्व हवेलीमधील सर्वच मतदारांना आहे. त्यामुळे, शिवाजीराव आढळराव यांना मागील निवडणुकीच्या तुलनेत या वेळी पूर्व हवेलीमधून जादा मताधिक्‍य मिळेल, असा विश्वास आमदार बाबूराव पाचर्णे यांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे व्यक्त केला. 

लोणी काळभोर ः थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना चालू होऊ नये, यासाठी पडद्यामागून कोण प्रयत्न करते, याची माहिती ऊस उत्पादकांना व पूर्व हवेलीमधील सर्वच मतदारांना आहे. त्यामुळे, शिवाजीराव आढळराव यांना मागील निवडणुकीच्या तुलनेत या वेळी पूर्व हवेलीमधून जादा मताधिक्‍य मिळेल, असा विश्वास आमदार बाबूराव पाचर्णे यांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे व्यक्त केला. 

राज्य सरकारच्या माध्यमातून कारखाना चालू करण्यासाठी मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनाच हा कारखाना स्वतःच्या सोईसाठी थेऊर परिसर सोडून इतरत्र हवा आहे. यामुळेच संबंधित नेत्याच्या बगलबच्च्यांनीच मागील साडेचार वर्षांच्या काळात कारखाना चालू होऊ नये, यासाठी वेळोवेळी अडथळे आणले असल्याचा आरोपही पाचर्णे यांनी या वेळी केला. 

आढळराव यांच्या प्रचारार्थ पूर्व हवेलीत सोमवारी (ता. 15) आढळराव यांचा गावभेठ दौरा झाला. या वेळी भारतीय जनता पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष रोहिदास उंद्रे, महिला अध्यक्षा राजश्री काळभोर, चित्तरंजन गायकवाड, माउली कटके, श्रद्धा कदम, स्वप्नील कुंजीर, रमेश भोसले, सरपंच गौरी गायकवाड व त्यांचे सहकारी उपस्थित होते. 

पाचर्णे म्हणाले, ""कारखाना मागील सहा वर्षांपासून बंद आहे. हा कारखाना चालू करण्यासाठी राज्य सरकारने राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून कर्जाचे पुनर्घटन करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात व संचालक प्रकाश म्हस्के यांनी सुरवातीला अनुकूलताही दाखवली होती. मात्र, त्यानंतर दोनच दिवसांत घूमजाव केल्याने, कर्जाचे पुनर्घटन करणे शक्‍य झाले नाही. तर दुसरीकडे कारखाना चालू करण्यासाठी कारखान्याच्या मालकीची जमीन विक्री करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, जमिनीची विक्री होऊ नये, यासाठी कारखान्याच्या काही कथित हितचिंतकांनीच पडद्यामागून प्रयत्न केल्याने जमिनीची विक्री होऊ शकलेली नाही. जमीन विक्री होऊ न देणारे कोण आहेत याची कल्पना सर्वांनाच असल्याने, मतदार आमच्याच पाठीशी ठाम उभा आहे.'' 

या वेळी आढळराव म्हणाले की शिरूर-हवेलीसह सहाही मतदारसंघात महायुतीला मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता, शिरूर लोकसभा मतदारसंघातून विजय निश्‍चित झाला आहे. राज्य सरकारबरोबरच, खासदार या नात्याने मागील पंधरा वर्षांच्या कालावधीत केलेली विविध विकासकामे व मतदारसंघात असलेला संपर्क पाहता, या निवडणुकीत मतदार भरभरून प्रतिसाद देतील, अशी आशा आहे. 
 

संबंधित लेख