Owaissi - Ambedkar | Sarkarnama

कॉंग्रसचे नेते प्रकाश आंबेडकरांकडे मोठा गुलदस्ता घेऊन जातील- इम्तियाज जलील 

जगदीश पानसरे 
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

जाहीर सभेच्या आदल्या दिवशी प्रकाश आंबेडकर आणि आमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यात रात्री उशीरापर्यंत तब्बल अडीच तास माझ्या निवासस्थानी गुप्त चर्चा झाली. अर्थातच त्यामध्ये महाराष्ट्रात लोकसभा, विधानसभेच्या किती जागा लढवायच्या, कोणत्या आणि कुणी लढवायच्या याची प्राथमिक चर्चा झाली. 

- इम्तियाज जलील

औरंगाबादः वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांची मंगळवारी झालेली सभा रेकॉर्डब्रेक झाली आहे. या सभेमुळे अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत, आता कॉंग्रेसचे नेते प्रकाश आंबेडकरांकडे फुलांचा मोठा गुलदस्ता घेऊन जातील असा टोला एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलतांना लगावला.

बसपाच्या नेत्या मायावती, आरपीआयचे रामदास आठवले यांना बळ देण्याचे प्रयत्न देखील आता सत्ताधाऱ्यांकडून होतील असा दावा देखील त्यांनी केला. 

संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची संयुक्त जाहीर सभा काल औरंगाबादेत पार पडली. या सभेला लाखांच्यावर गर्दी झाली होती.

मराठवाडाच नाही तर राज्यभरातून या सभेसाठी लोक आले होते. परंतु या सभेत कुठलीच मोठी घोषणा किंवा लोकसभा, विधानसभा निवडणूकीच्या किती जागा आघाडी लढवणार याबद्दल सांगितले गेले नाही, त्यामुळे समर्थकांचा काहीसा हिरमोड झाल्याची चर्चा सभा संपल्यानंतर होती. 

या पार्श्‍वभूमीवर सभा यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे एमआयएमचे राज्यातील नेते आमदार इम्तियाज जलील यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, लोकांची अपेक्षा होती, पण निवडणुकीच्या तयारी संदर्भात किंवा आघाडीत कोण, कुठून किती जागा लढवणार हे पहिल्याच सभेत जाहीर करणे घाईचे ठरले असते. निवडणुकांना आणखी बराच अवधी आहे. 

दलित, मुस्लिम आणि बहुजनांना न्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय ओवेसींनी घेतला आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही परिस्थीती आम्ही त्यांची साथ सोडणार नाही. या दोन्ही नेत्यांची कालची सभा कमालीची यशस्वी ठरली आहे. राज्यात निर्माण होऊ पाहणारी वंचितांची ही नवी लाट थोपवण्याचे प्रयत्न सत्ताधारी पक्षाकंडून येणाऱ्या काळात केले जातील. 

अगदी बसपाच्या नेत्या मायावती, आरपीआयचे नेते आणि केंद्रातील भाजप सरकारमध्ये मंत्री असलेले रामदास आठवले यांना बळ देण्याचे प्रयत्न जाणीवपुर्वक केले जातील. एवढेच नाही तर प्रकाश आंबेडकरांना गुलाब फुलांचा गुलदस्ता देऊन आय लव्ह यू म्हणणारी कॉंग्रेस आणि त्यांचे नेते आता आधीपेक्षा मोठा फुलांचा गुच्छा घेऊन त्यांची मनधरणी करायला जातील अशी शक्‍यता देखील इम्तियाज जलील यांनी वर्तवली. 

दोन्ही नेत्यांमध्ये अडीच तास गुप्त चर्चा 

महाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएम वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार आहे. जाहीर सभेच्या आदल्या दिवशी प्रकाश आंबेडकर आणि आमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यात रात्री उशीरापर्यंत तब्बल अडीच तास माझ्या निवासस्थानी गुप्त चर्चा झाली. अर्थातच त्यामध्ये महाराष्ट्रात लोकसभा, विधानसभेच्या किती जागा लढवायच्या, कोणत्या आणि कुणी लढवायच्या याची प्राथमिक चर्चा झाली. 

यापुढे देखील दोन्ही नेत्यांच्या वारंवार भेटी आणि बैठका होणार आहेत. त्यामुळे कालच्या बैठकीत झालेली चर्चा व त्याचा तपशील जाहीर सभेत जाहीर करणे उचित ठरले नसते. किंवा ते खूप घाईचे ठरले असते असेही इम्तियाज जलील यांनी सांगतिले.  

संबंधित लेख