Over 1 lack bogus ration cards in Mumbai | Sarkarnama

मुंबईत 1 लाख 28 हजार बोगस रेशन कार्ड

संजीवकुमार भागवत : सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 30 मार्च 2017

या प्रकरणात दोषी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही, यासाठी जिल्ह्याबाहेरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून एका महिन्यात मी स्वतः भुसावळ येथे बैठक घेईन- गिरीश बापट

अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची माहिती

मुंबई - मुंबईत 1 लाख 28 हजार बोगस रेशन कार्ड तपासणीत आढळून आली असून त्यातील 55 हजार तातडीने रद्द करण्यात आली आहेत. रेशन व्यवस्थेतीतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक रेशनकार्डधारकाला यापुढे बायोमॅट्रिक पद्धतीने रेशन देण्यात येणार असून त्यासाठी लवकरच यंत्रणा राबवली जाणार असल्याची माहितीही मंत्री बापट यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

अमर काळे, संजय सावकारे, डॉ. संजय रायमूलकर यांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील बोगस शिधाप

पत्रिका स्वस्त धान्य दुकानांवर कारवाईबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
सावकारे यांनी भुसावळ येथे उपाध्याय नावाच्या एकाच व्यक्तीकडे गैरमार्गाने 11 दुकाने असताना त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, मात्र ज्यांनी तक्रारी केल्या त्यांच्यावरच कारवाई का केली जाते असा सवाल उपस्थित केला होता.

यावर बापट यांनी सांगितले की या प्रकरणात दोषी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही, यासाठी जिल्ह्याबाहेरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून एका महिन्यात मी स्वतः भुसावळ येथे बैठक घेईन असे आश्वासन दिले. तसेच येथील रेशन मधील गैरप्रकारासाठी सरकारने 22 लोकाना मोक्का आणि 40 लोकांना एमपीडीए अंतर्गत  कारवाई केली असल्याचेही बापट यांनी सांगितले.

संबंधित लेख