Our Aditya pays respect to seniors : Harshwardhan Jadhav | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

आमचा आदित्य मोठ्यांच्या पाया पडतो, मोठ्यांकडून पाया पडून घेत नाही : हर्षवर्धन   

जगदीश पानसरे 
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

आदित्यवर्धन  याला राजकारणाचा वारसा स्वतःच्या घरातून आहे तसाच आजोळातूनही आहे .  आदित्यवर्धनचे वडील हर्षवर्धन, आजोबा दिवंगत आमदार रायभान जाधव, आजी आमदार तेजस्विनी जाधव यांनी राजकारण गाजवलेच पण आईने देखील जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेले आहे .   आजोळाकडून त्याचे आजोबा रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व खासदार आहेत .  मामा संतोष दानवे आमदार आहे , मावशी आशा पांडे ,जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत 

औरंगाबादः शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचे चिरंजीव आदित्यवर्धन यांच्याविषयी बोलताना थेट आदित्य ठाकरे यांनाच टोला लगावला.

  "आमचा आदित्य मोठ्यांच्या पाया पडतो, हिंदु संस्कृतीत लहान्याने मोठ्यांकडून पाया पडून घेऊ नये, उलट मोठ्यांच्याच पाय पडावे हे त्याला चांगले माहित आहे," असे म्हणत त्यांनी खासदार चंद्रकांत खैरे आणि आदित्य ठाकरे यांच्यातील गाजलेल्या नमस्काराची आठवण करून दिली .  
 

कन्नड-सोयगांवचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर राजीनामा देत शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना केली. पक्षाच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी दसऱ्याच्या मुर्हूतावर पार पडले. स्वतःचा  पक्ष स्थापन केल्यानंतर या व्यासपीठावरून हर्षवर्धन जाधव यांनी पहिले भाषण करत शिवसेना आणि खासदार खैरे यांच्यावर अपेक्षेप्रमाणे तोंडसुख घेतले. 

पण या कार्यक्रमाचे आकर्षणस्थान बनला आदित्यवर्धन .  हर्षवर्धन जाधव यांच्या अवघ्या चौदा वर्षाच्या आदित्यवर्धन या मुलाने या कार्यक्रमात भाषण करून सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले . पक्ष स्थापनेच्या निमित्ताने मला भाषण करायचे असा आग्रहच त्याने वडिलांकडे केला होता.   औरंगाबादच्या नाथ  व्हॅली स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत असलेल्या आदित्यवर्धनने आग्रह करून छान  मराठीतून पाच ते दहा मिनिट भाषण करत सर्वांनाच आश्‍चर्यचकित केले. 

संपुर्ण राजकीय वातावरणात लहानचा मोठा झालेला आदित्यवर्धन हाही भविष्यात आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे राजकारणातच जाणार याची झलक त्याने आपल्या छोटेखानी भाषणातून दाखवून दिली. 

"माझे वडील राजकारण करत नाही, तर समाजकारण करतात, ज्यांनी वर्षानुवर्षे शहर आणि जिल्ह्यावर सत्ता गाजवली त्या खासदारांना कसलाच विकास करता आला नाही. रस्ते, पाणी, कचरामुक्त शहर या मुलभूत गरजा देखील त्यांनी पुर्ण केल्या नाहीत. त्यामुळे आमदार हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा म्हणून नाही तर या शहराचा नागरिक म्हणून मला बदल हवा आहे ,"अशी  भूमिका मांडत आदित्यवर्धन जाधव याने दमदार भाषण केले. 

स्वंतत्र पक्ष माझ्या वडलांनी का काढला? या मागे त्यांचा उद्देश काय होता हे सांगतांनाच आदित्यवर्धनने एखाद्या मुरब्बी राजकारण्या सारखी विरोधकांवर टिकाही केली. शिवस्वराज्य बहुजन पक्षाला खंबीरपणे पाठिंबा द्या ,असे आवाहन देखील केले.

 
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात... हर्षवर्धन जाधव 

" बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात तेच खरं.. पक्ष कार्यालयाच्या उद्घटनाच्यावेळी आदित्यवर्धन भाषण करेल असे कधी वाटलेच नाही. पण त्याने माझ्याकडे आग्रह केला, म्हटंल पोरंग म्हणतयना तर करू द्या भाषण, एक दोन मिनिट बोलेल आणि बसेल खाली असा विचार मी केला आणि भाषणाला परवानगी दिली. पण ज्या खुबीने त्याने भाषण केले ते पाहून मलाही आश्‍चर्य वाटले. शेवटी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तेच खर ,"अशी उत्सर्फूत प्रतिक्रिया हर्षवर्धन जाधव यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना दिली. 

आदित्यवर्धन याच्या भाषणाच्या निमित्ताने शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांना चिमटा काढण्याची संधी देखील हर्षवर्धन जाधव यांनी साधली. "आमचा आदित्य मोठ्यांच्या पाया पडतो, हिंदु संस्कृतीत लहान्याने मोठ्यांकडून पाया पडून घेऊ नये, उलट मोठ्यांच्याच पाय पडावे हे त्याला चांगले माहित आहे," असा टोलाही हर्षवर्धन जाधव यांनी या निमित्ताने लगावला.

संबंधित लेख