परप्रांतियांच्या लोंढ्यांमुळे मुंबईला विशेष मदत : सिंह 

 परप्रांतियांच्या लोंढ्यांमुळे मुंबईला विशेष मदत : सिंह 

मुंबई : मुंबईत परप्रांतियांच्या अविरत लोंढ्यांमुळे निर्माण झालेल्या समस्या, अडचणींची अधिकृत दखल 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंह यांनी बुधवारी मुंबई दौऱ्यात घेतली. या लोंढ्यांमुळे पायाभूत सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेता मुंबईसाठी केंद्राच्या योजनांतून विशेष मदत देण्याचा विचार करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

महाराष्ट्राची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत उत्तम व समाधानकारक आहे. आर्थिक शिस्तीत महाराष्ट्राचा आदर्श इतर राज्यांनी घ्यायला हवा, असे प्रशस्तिपत्रक देतानाच सिंह यांनी मुंबईची दुखरी नस पकडली. ते म्हणाले की, "इतर राज्यांतून येणाऱ्या नागरिकांचा प्रश्न महाराष्ट्र विशेषतः मुंबईसाठी महत्त्वाचा आहे. लाखो परप्रांतीय नागरिक मुंबईत स्थायिक होत असल्याने त्यांच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर सरकारचा मोठा खर्च होतो. त्यासाठी केंद्रीय साह्य मिळणाऱ्या योजनांतून विशेष मदत मिळावी, म्हणून वितरणाची पुनर्रचना करता येईल काय, यावर आयोग विचार करेल'. 

मात्र, स्थलांतरितांची समस्या केवळ महाराष्ट्रातच नाही, तर तामिळनाडू, केरळ अशा राज्यांमध्येही गंभीर आहे. स्थलांतरितांमुळे पायाभूत सुविधा, आरोग्य आदींवर मोठा ताण पडतो. त्यामुळे मुंबईतील स्थलांतरितांच्या या समस्येवर आयोग विचार करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेतली. गुजरात, कर्नाटक व तामिळनाडू या प्रगतिशील राज्यांची अर्थव्यवस्था कमालीची कोसळत असताना तुलनेत महाराष्ट्राने मात्र उत्तम प्रकारे नियंत्रण मिळवल्याचे सिंह यांनी सांगितले. 

पंधराव्या वित्त आयोगाने दोन दिवसांच्या दौऱ्यात पुणे येथे 35 अर्थतज्ज्ञांशी चर्चा केली. त्यानंतर मुंबईत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी; तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती व नगरपालिकेच्या प्रतिनिधींचे म्हणणे जाणून घेतले. बुधवारी आयोगाने मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. 

महाराष्ट्राच्या सादरीकरणावर वित्त आयोग खूश असून, भविष्यातील प्रगतीचे आश्‍वासक चित्र अशा प्रकारच्या वित्तीय नियोजनातूनच शक्‍य असल्याचे आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंह म्हणाले. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. "ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी' गाठण्याचे महाराष्ट्राचे ध्येय व त्यासाठीचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

असमतोल दूर करणार 
मानव विकास निर्देशांकात महाराष्ट्राची प्रगती चांगली असल्याचा निष्कर्ष आयोगाने नोंदवला; मात्र केवळ काही विशिष्ट भागातच विकासाला चालना न देता विभागीय असमतोल, आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी आयोग सूत्र ठरवेल, असे सिंह म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com