Opposition is trying to defame me :Ramdas Kadam | Sarkarnama

विरोधक मला बदनाम करायला निघालेत : रामदास कदम

सुचिता रहाटे : सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

मुख्यमंत्री न्यायालयापेक्षा मोठे नाहीत . माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. मी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीन. याप्रकरणी विरोधक भुवड यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन माझ्यावर निशाणा करत आहेत असेही, रामदास कदमांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबई, ता.२८ :मुंबई, ता.२८ : डेंटल कॉलेज-वसतिगृहाच्या जागेचे निमित्त करून  विरोधक माझ्या बदनामीचा  कट रचत आहेत. या जागेच्या मालकीची सर्व कागदपत्रे मी सादर करीत असून विरोधकांचे आरोप धाटांत खोटे आहेत .

माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या आत्माराम भुवड यांच्यावर दहा कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे असे, आज रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

 रत्नागिरीतील खेडमध्ये योगिता दंत महाविद्यालय उभारण्यासाठी रामदास कदम यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप आत्माराम भुवड यांनी केला आहे.

आत्माराम भुवड हे रत्नागिरीतील खेड या गावचे मुळचे रहिवासी. भुवड हे ६२ वर्षीय गृहस्थ असून आपल्या संपुर्ण कुटुंबासहत ते येथे राहतात. भुवड कुटुंबाची खेडमध्ये असलेली 41 गुंठे  वडिलोपार्जित जमीन रामदास कदमांनी हडपल्याचा आरोप आत्माराम यांनी केला आहे.

परंतु ४१ गुंठे जागाच याठिकाणी नाही असे कदमांनी सांगितले.  ४५/१ अ ही ४ एकरी जमीन २०१६ साली मी रीतसर खरेदी केलेली आहे तसेच भुवड यांनी ४१ ब जमिनीवर दावा ठोकला आहे परंतु ४१ ब अशी कोणतीच जमीन अस्तित्वात नाही. असे रामदास कदम यांनी सांगितले.

खेड तालुक्यात रामदास कदमांचं योगिता दंत महाविद्यालय आहे. तर त्याशेजारीच शिवतेज आरोग्य सेवा संस्थेनं वसतिगृह उभारलं आहे. मात्र या दंत विद्यालय आणि वसतिगृहासाठी भुवड यांनी आपली जमीन बळकावल्याचा आरोप भुवड यांनी केला आहे.आत्माराम भुवड यांनी केलेले आरोप रामदास कदम यांना मान्य नाहीत. जमीन परत मिळवण्यासाठी आत्माराम भुवडांनी सर्वोतोपरी प्रयत्न करून सुद्धा कुठूनही दाद मिळत नसल्याने  उपोषणाचा दावा केला आहे.

यावर काँग्रेस नेते नितेश राणे यांनी रामदास कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तसेच धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे याप्रकरणी 'पारदर्शक' चौकशीची मागणी केली आहे. त्यावर रामदास कदम गरजले व म्हणाले की, मुख्यमंत्री न्यायालयापेक्षा मोठे नाहीत . माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. मी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीन. याप्रकरणी विरोधक भुवड यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन माझ्यावर निशाणा करत आहेत असेही, रामदास कदमांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संबंधित लेख