सत्ता गेलेल्या विरोधकांना झोप लागत नसल्याने ते जातीयवादावर उतरले : माधव भांडारी 

Madhav-Bhandari
Madhav-Bhandari

धुळे : "  बदलत्या जनमानसामुळे सांगली, जळगाव महापालिकेचा लागलेला निकाल  स्वीकारण्याऐवजी भाजपचे सर्व विरोधक आपापल्या 'फॅन्टसी'मध्ये जगत आहेत. तात्पुरत्या राजकारणातून त्यांना समाधान मिळतही असेल. फडणवीसांची कशी वाट लावत आहोत असे मानून खूषही असतील. मात्र, ते बहुजन समाजाची, सर्वसामान्यांची वाट लावत आहेत," अशा शब्दात भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी  यांनी विरोधकांवर टीकेचा प्रहार केला. ते विकास कामांच्या उद्‌घाटनासाठी आज (शनिवार) दौऱ्यावर होते. 

"सरकारनामा'शी बोलताना श्री. भांडारी  म्हणाले, "  भाजप मोठा, क्रमांक एकचा पक्ष असल्याने सर्व विरोधक विरोध करतील हे स्वाभाविक आहे. राज्यातील 2014 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपला 29 टक्के मते होती. नंतरच्या चार वर्षांमधील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून भाजपला 34 टक्के मते मिळाली आहेत. म्हणजेच पाच टक्के मतांची वाढ झालेली आहे. हे पक्षाचे मोठे यश आहे. त्यांनी 70 वर्षांत चुकीचे राजकारण केले ते समजून घेण्यास, चुका दुरुस्त करण्यास तयार नाहीत. इव्हीएम मशिन कॉंग्रेसनेच आणले. तेव्हा ते, मित्र पक्ष जिंकत होते तर मशिन बरे, आता पराभूत होत आहेत तर मशिनमध्ये घोटाळा, हा कुठला प्रकार? " 
 

विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकट्या भाजपने लढविल्या आहेत. ही स्थिती पाहता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हा पॅटर्न बदलेल, असे वाटत नाही आणि कुठले कारणही दिसत नाही. केंद्राप्रमाणे राज्यात पूर्णपणे, बहुमताने सत्तेत येऊ हा दृढ विश्‍वास आहे. सर्व पद्‌धतीने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजप तयार आहे. असेही  श्री. भांडारी  म्हणाले . 

" राज्यात जातीयवादाची दरी रुंदावत ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करून  श्री. भांडारी  पुढे  म्हणाले," आपली गेलेली सत्ता परत आणण्यासाठी हेच एक साधन असल्याचे त्यांना वाटत आहे. जातीय भांडणे लावली नाही तर सत्ता मिळण्याची आशा नाही, असे त्यांना वाटते. वर्षानुवर्षे हाती राहिलेली सत्ता गेल्याने हवालदारही सलाम करत नाही, मागेपुढे ताफा नसल्याने झोप लागत नसल्याने ते अस्वस्थ आहेत. जनतेचे मत परिवर्तन करण्याऐवजी मग सोपा मार्ग कुठला तर जातीयवादाची दरी रुंदावत ठेवायची, असा त्यांचा प्रयत्न दिसतो. "


" जनमानस बदलत आहे. भाजप वगळता अन्य कुठलाही पक्ष ते समजून घेण्यास तयार नाही. त्यांना हे "मिथ' वाटते. ज्या सांगलीत चाळीस वर्षे भाजपचा नगरसेवक नव्हता तिथे सत्ता हाती आली हेच बदलते जनमानस विरोधक मानायला तयार नाहीत. ते आपल्याच "फॅन्टसी'त जगत आहे. ते बरे आहे आमच्यासाठी. त्यांनी असेच राहावे. भाजपवर हिंदुत्ववादी, जातीयवादाचा आरोप केला जातो. परंतु, जनमाणसाने 2014 च्या निवडणुकीत धर्मनिरपेक्षता, समाजवादाचा चेहरा निर्णायक बदलला. मग आताच्या चार वर्षांत काय घडले की त्यांचा चेहरा स्वीकारावा? काश्‍मीर वगळता गेल्या चार वर्षांत देशात दहशतवादी हल्ला, जातीय दंगली घडल्या नाहीत. याउलट "यूपीए' सरकारच्या दहा वर्षांच्या काळात 57 मोठे दहशतवादी हल्ले झाले. त्याची उत्तरे कुठे आहेत? , असा प्रश्न  श्री. भांडारी  यांनी उपस्थित केला .  

महाराष्ट्र दोन ते अडीच दशकात नकारात्मकतेकडे चालले आहे. समाजसुधारणेसह उद्योग, शेती, शिक्षणात पहिल्या तीन क्रमांकात राहणारे आपले राज्य 37 वर्षांत पिछाडीवर गेले आहे. हे कॉंग्रेस आघाडीच्या राजकारणाचे दुष्परिणाम आहेत. वीस वर्षांत राज्यातून इतरत्र का, कशामुळे उद्योग बाहेर गेले यावर ते चर्चा करत नाहीत. या उलट चार वर्षांत भाजप सरकारने राज्यात "पॉझीटीव्हीटी' तयार केली. शेती, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे याव्दारे शेतीखालचे क्षेत्र, उत्पादन वाढविले. औद्योगिक उत्पादनात स्थैर्य आणल्याचे महामार्गावरील वाढती अवजड वाहतूक त्याची साक्ष देते. यासह असंख्य कामांतून भाजप सरकारने तयार केलेली "पॉझीटीव्हीटी' टिकवून ठेवली नाही, तिचा फायदा घेतला नाही तर महाराष्ट्र 25 वर्षे मागे जाईल," असे श्री. भांडारी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com