one traffic inspector has responsibility to save MP and MLA`s reputation | Sarkarnama

PI तावसकर हे खासदार आढळराव, आमदार गोरे यांना रस्त्यावर उतरू देतील का?

भरत पचंगे
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न इतका जटील बनला आहे की प्रवासी अक्षऱक्षः वैतागले आहेत. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव आणि खेडचे आमदार सुरेश गोरे हे प्रश्न सोडविण्यासाठी काही करत नाहीत, अशी टीका सोशल मिडियातून वारंवार होत असते. आता येथे वाहतुकीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात आला आहे.

शिक्रापूर : पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त पद्मनाभन यांनी चाकणमधील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र अधिकारी आता नेमला आहे. पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांची चाकणच्या वाहतूक शाखेच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तावसकर यांनी चाकणमधील वाहतुकीची स्थिती सुधारली तर तेथील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

चाकण येथील वाहतुकीचा प्रश्न प्रचंड जिकिरीचा बनला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर असणारी औद्योगिक वसाहती, नाशिककडे जाणारी वाहने, पुणे, पिंपरी या शहरांतून कारखान्यांकडे जाणारे नागरिक यांच्यासह स्थानिकांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड फटका बसतो. येथील लोकप्रतिनिधी नक्की काय करतात, असा प्रश्न कोडींत अडकलेल्या नागरिकांच्या मनात येतो.

सोशल मिडियातून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांना या प्रश्नावर अनेकदा ट्रोलही करण्यात आले. आपण येथील वाहतूक कोंडीला कसे जबाबदार नाही आणि तत्कालीन आमदारांच्या हट्टाग्रहामुळे पूल कसे चुकले हे पटवून देण्यात आढळरावांना शक्ती खर्ची करावी लागली. आमदार सुरेश गोरे यांना तर स्वतः हातात दंडुके घ्यावे लागले. त्यांनी दंडुके दाखवून घेऊन बेकायदेशीर रिक्षा व्यावसायिकांना चाकणमधून हटविण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. आता हे दोघे आक्रमक होऊनही येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नाही तर आणखी स्थिती अवघड होईल, हे लक्षात आल्याने त्यासाठी त्यांनी नव्याने तयार झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आय़ुक्तालयाचे प्रमुख पद्मनाभन यांच्याकडे पाठपुरावा ठेवला होता. 

त्यावर पद्मनाभन यांनी आता येथील वाहतूक सांभाळण्याची जबाबदारी तावसकर यांच्यावर सोपविली आहे. त्यांच्या दिमतीला एक अधिकारी, १५ पोलिस कर्मचारी, १६ होमगार्ड व २६ ट्राफीक वार्डन असे ५७ कर्मचारी देण्यात आले आहेत. बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाईच्या सूचना पद्मनाभन यांनी दिल्या आहेत. तावसकर यांच्याकडे संपूर्ण औद्योगिक वसाहत, तळेगाव दाभाडे-शिक्रापूर रस्त्यावरील म्हाळूंगे ते चाकण आणि चाकण ते चौफुला (ता.शिरूर) तसेच पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी ते राजगुरुनगर या महामार्ग हद्दीतील वाहतूक नियंत्रणाचा कार्यभार असणार आहे.
   
तावसकर यांनी शिक्रापूर (ता.शिरूर) येथे सन २०१० ते १२ या दोन वर्षाच्या कार्यकालात तळेगाव-शिक्रापूर बनावट शेअर घोटाळा, इस्पात चोरी प्रकरणांच्या तपासासारखी अनेक प्रकरणे त्यांनी गाजविली. आक्रमक पोलिस अधिकारी म्हणून त्यांचा लौकीक आहे. तावसकर यांच्या येथील कामगिरीवर एक खासदार आणि एक आमदार यांचेही त्यामुळेच लक्ष राहणार आहे.

संबंधित लेख