one toilet for all in govt offices | Sarkarnama

सरकारी कार्य़ालयांत टाॅयलेटमध्ये व्हीआयपी संस्कृती नको : रावत

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

माजी खासदार प्रदीप रावत यांनी तुलनेने छोट्या पण महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. सरकारी कार्यालयांतील अधिकाऱ्यांची टाॅयलेट चकाचक असतात. तेच सर्वसामान्य जनतेसाठीची टाॅयलेट अस्वच्छतेने माखलेल. सरकारी कार्यालयांतील हा भेदभाव दूर व्हायला हवा. तरच सर्वत्र स्वच्छता राखली जाईल.

पुणे : महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व सरकारी कार्यालयात स्वच्छतागृहांची वर्गवारी केलेली असते. अधिकाऱ्यांची स्वच्छतागृहे चांगल्या स्थितीत; तर सर्वसामान्यांसाठीची स्वच्छतागृहे दुर्गंधीने माखलेले असतात. हे चित्र बदलण्यासाठी सर्व सरकारी कार्यालयात एकच स्वच्छतागृह हवे,'' अशी मागणी माजी खासदार प्रदीप रावत यांनी केली. "आम्ही घाण सहन करणार नाही' हे लोकांनीच आता ठासून सांगायला हवे, असेही ते म्हणाले. 

"नॅशनल शिपिंग बोर्डा'च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रावत यांचा "बाळासाहेब अमराळे मित्र परिवारा'तर्फे आयोजित सोहळ्यात महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी "दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट'चे अध्यक्ष अशोक गोडसे, हभप शिवाजी महाराज मोरे, आशा रावत, बाळासाहेब अमराळे आदी उपस्थित होते. 

रावत म्हणाले, ""सरकारी कार्यालयातील लोकांसाठीची स्वच्छतागृहे घाण असतात. तेच चित्र शहरातील महापालिकेच्या स्वच्छतागृहांचे आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतागृहांचा प्रश्‍न आपण तातडीने सोडवायला हवा. स्वच्छतागृहे ही स्वच्छच असली पाहिजेत. याबरोबरच महिलांच्या स्वच्छतागृहात वाढ व्हावी. यापुढे जाऊन पुण्यातील गटारे बनलेली नदी, नाले स्वच्छ करायला हवीत. नद्यांचे आजचे चित्र पालटू शकते. आता तर पुण्यात, राज्यात आणि केंद्रातही आपली सत्ता आहे. त्यामुळे ही कामे वेगाने व्हायला हवीत.'' 

या वेळी बोलताना महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ज्यांच्यामुळे मी राजकारणात आले त्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली. हा सत्कार म्हणजे एका शिष्याने गुरूचा केलेला सत्कार आहे. सुरवातीला नगरसेवक पदाला उभे राहायलाही मी घाबरत होते. अशा वेळी दादांनीच (प्रदीप रावत) मला प्रोत्साहन दिले. राजकारणात आणले. 

संबंधित लेख