omprakash bakoriya | Sarkarnama

सिक्‍सपॅकसाठी नाही, तर फीट राहण्यासाठी जीम - ओमप्रकाश बकोरिया

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

स्टॅमीना आणि तंदुरूस्त शरीर यावरच माझे लक्ष केंद्रित असते. त्यामुळेच गेल्या अकरा वर्षापासून मी स्वःताला फीट ठेवू शकलो. माझी उंची 174 सें.मी. आहे. उंची प्रमाणे माझे योग्य वजन 74 किलो असायला हवे, पण माझे वजन त्याहीपेक्षा एक किलोने कमी म्हणजे 73 किलो एवढे आहे. म्हणूनच अकरा वर्षात मी आजारी आहे म्हणून मला रजा घेऊन कधी घरी बसावे लागलेले नाही. 

औरंगाबाद : बॉडी बिल्डींग किंवा सिक्‍सपॅक दाखवता यावे म्हणून मी जीम किंवा व्यायाम करत नाही, तर कायम फिट राहावे यासाठीच नियमितपणे जीममध्ये घाम गाळतो. परिणामी 11 वर्षाच्या प्रशासकीय सेवेत कधी मी आजारी रजा घेतली नसल्याचे औरंगाबाद येथील महावितरणचे प्रादेशिक व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी "सरकारनामा ' शी बोलतांना सांगितले. गोड पदार्थ, रात्रीच्या जेवणात भात आणि गव्हाची पोळी मी कटाक्षाने टाळतो. रोज दोन ते अडीच तास जीममध्ये व्यायाम हेच माझ्या फिटनेसचा राज असल्याचे बकोरिया सांगतात. 

शाळा, महाविद्यालयीन काळापासूनच मला व्यायामाची आवड होती. कारण माझे प्राथमिक शिक्षण छत्तीसगडमध्ये झाले आहे. आदिवासी आणि डोंगराळ भागात चार ते पाच किलोमीटरची पायपीट, नदी, नाले ओलांडून शाळा गाठावी लागयची. त्यामुळे धावण्याची, चालण्याची सवय होतीच. पुढे आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण बैतुल जिल्ह्यात झाले. तेव्हा वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घ्यायचो. पहाटे चार-साडेचार वाजता उठून दोन ते तीन किलोमीटर धावणे आणि नियमित व्यायाम हा माझा नित्यक्रम होता. 2006 मधील आयएएस बॅचमधून सर्वप्रथम माझी नेमणूक गडचिरोली जिल्ह्यातील अल्लापल्ली आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली. त्यानंतर विविध ठिकाणी बदलीमुळे जावे लागले, त्यामुळे सकाळी उठून पळणे, नित्याच्या व्यायामात खंड पडला. पण साधारणता 2011 पासून मी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ असे दोन तास नियमित जीम करतो. सोमवार ते शनिवार जिमचे प्रकार ठरलेले आहेत. यात वॉर्मअप, सायकलिंग, लिफ्टींग, चेस्ट, बायसेप्स, ट्रायसेप्स, बॅक- लोअर बॅक, शोल्डर, कार्डियाकचा समावेश असतो. रविवारी जीमला सुटी असते, त्या दिवशी हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ यापैकी कुठलाही खेळ एन्जॉय करतो. आर्मी गोल्फ कोर्सवर दोन ते तीन तास सराव, कधी लॉन टेनिसचा आनंद घेता. 

भात, गव्हाची पोळी टाळतो 
एव्हरीटाईम फीट राहण्यासाठी केवळ जीम मधील व्यायाम पुरेसा नाही हे मी अनुभवावरून सांगतो. त्यासाठी योग्य आणि संतुलित आहार देखील तितकाच महत्वाचा आहे. माझा ब्रेकफास्ट हेवी असतो. दुपारच्या जेवणात भात आणि गव्हाच्या पोळीचे प्रमाण अत्यंत कमी असते. फायबरयुक्त आहाराला मी प्राधान्य देतो. रात्रीच्या जेवणात पोळी, भात नसतोच. रोस्टेड चिकन, अंडी, उकडलेल्या भाज्या, सुप आणि मासे याला पसंती असते. गोड पदार्थ टाळतो, त्यातील ग्लुकोजमुळे शरीरातील चरबी वाढते. रात्रीचे जेवण आठच्या आगोदर घेण्यावर माझा भर असतो. गेल्या अनेक वर्षात हा शिरस्ता मी मोडलेला नाही. विशेष म्हणजे माझी पत्नी देखील हे सगळे नियम, डायट प्लॅन आणि जीममधील सराव करते. जीममधून आल्यावर नारळ पाणी, प्रोटीन पावडरमुळे तरतरी येते. मसल्स, सिक्‍सपॅक किंवा आकर्षक बॉडी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी जीम करत नाही. स्टॅमीना आणि तंदुरूस्त शरीर यावरच माझे लक्ष केंद्रित असते. त्यामुळेच गेल्या अकरा वर्षापासून मी स्वःताला फीट ठेवू शकलो. माझी उंची 174 सें.मी. आहे. उंची प्रमाणे माझे योग्य वजन 74 किलो असायला हवे, पण माझे वजन त्याहीपेक्षा एक किलोने कमी म्हणजे 73 किलो एवढे आहे. म्हणूनच अकरा वर्षात मी आजारी आहे म्हणून मला रजा घेऊन कधी घरी बसावे लागलेले नाही. 

संबंधित लेख