बकोरिया पुन्हा औरंगाबादेत, पण महावितरणमध्ये

बकोरिया पुन्हा औरंगाबादेत, पण महावितरणमध्ये

औरंगाबाद : महापालिकेचे आयुक्त असताना वर्षभरातच बदली झालेले ओम प्रकाश बकोरिया यांची दोन आठवड्यातच पुन्हा औरंगाबाद येथे महावितरणच्या प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. 

औरंगाबाद येथून त्यांची अकोला येथे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची बदली करण्यात आली होती. बकोरिया यांनी बदलीला दुजोरा दिला असून येत्या दोन दिवसांत आपण नव्या नियुक्तीच्या ठिकाणी पदभार स्वीकारणार असल्याचे "सरकारनामा'शी बोलतांना त्यांनी सांगितले. 

पुणे महापालिकेचे सहायक आयुक्त म्हणून कार्यरत असतांना बकोरिया यांची औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पदभार स्वीकारताच बकोरिया यांनी महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावत गैरप्रकार करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. समांतर जलवाहिनी शहरवासियांवर अन्याय करणारी योजना असल्याचे सांगत ही योजना रद्द करत बकोरिया यांनी राजकारण्यांना मोठा दणका दिला होता.

याशिवाय रस्त्यातील कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत शहर अभियंता सखाराम पानझडे, जिल्हा परिषद मैदानावर लागलेल्या आग प्रकरणी हलगर्जीपणा केल्यामुळे अग्निशामक विभागप्रमुख शिवाजी झनझन, बोगस बीलप्रकरणी नगररचना विभागाचे सहायक संचालक डी.पी.कुलकर्णी यांच्यासह पाच जणांवर निलंबनाची कारवाई करत आपल्या धडाकेबाज कामाची चुणूक दाखवून दिली होती. या शिवाय लेखा विभागाचे संजय पवार यांना देखील बोगस बिल प्रकरणात निलंबित करून महापालिकेतील चार मोठ्या अधिकाऱ्यांची चौकशी लावली होती.

नियमबाह्य कामांना चाप लावल्यामुळे त्यांच्यावर राजकारण्यांचा रोष होता. त्यामुळे वर्षभरातच बकोरिया यांची अकोला येथे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी होती. कौटुंबिक अडचणीमुळे बकोरिया यांची देखील आणखी दोन वर्ष औरंगाबादेतच थांबण्याची इच्छा असताना त्यांच्या बदलीचे आदेश आले होते. 
दोन आठवड्यात बदली 
ओम प्रकाश बकोरिया यांनी औरंगाबादहून बदली झाल्यानंतर 2 मे रोजी अकोला येथे जाऊन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला. दरम्यान सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांची महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केल्याचे बोलले जात होते. मात्र उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा केंद्रेकरांना विरोध होता अशी चर्चा होती. नागपूरहून आपल्या मर्जीतील अधिकारी आणण्यासाठीच त्यांनी केंद्रेकरांच्या नावाला विरोध केल्याचे बोलले जाते. त्यानंतर सुनील केंद्रेकर यांची कृषी आयुक्त म्हणून पुण्याला बदली करण्यात आली.

आता दोन आठवड्यातच बकोरिया यांची पुन्हा औरंगाबाद येथे महावितरणच्या प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. या संदर्भात बकोरिया यांच्यांशी संपर्क साधला असता त्यांनी बदलीला दुजोरा दिला, व दोन दिवसांत आपण पदभार स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले. 
बदली आदेशाबाबत गोंधळ 
बकोरिया यांची बदली महावितरणमध्ये झालेली असतानाच तिकडे शनिवारी (ता.13) नागपूर येथील महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांची औरंगाबाद महावितरण प्रादेशिक कार्यालयात संचालक म्हणून बदली झाल्याचे पत्र प्राप्त झाल्याचे महावितरणकडून सांगितले जात आहे. त्यामुळे औरंगाबादला नेमकी कुणाची बदली झाली आहे, या संदर्भात महावितरणमध्येच संभ्रम निर्माण झाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com