बकोरियांच्या बदली मागे "समांतर जलवाहिनीचा'मुद्दा

बकोरियांच्या बदली मागे "समांतर जलवाहिनीचा'मुद्दा

औरंगाबाद : महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या बदलीवरून आता शहरातील राजकीय नेत्यामंध्ये वादावादी सुरू झाली आहे. शहरात चांगले काम करत असतानाच अधिकाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण केलेल्या बकोरियांच्या बदलीची कुणीही मागणी केलेली नव्हती. तरी देखील मुदतीच्या आत केवळ चौदा महिन्यात त्यांना घालवले. यामागे समांतर जलवाहिनीसाठी वॉटर युटिलिटी कंपनीशी केलेला करार रद्द करणे हेच प्रमुख कारण होते हे जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बकोरिया यांच्या बदलीवरुन आता शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे व आमदार संजय शिरसाट यांच्यातच वाद जुंपला आहे. 

औरंगाबाद शहराची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीतून समांतर जलवाहिनी योजनेला मंजुरी मिळाली होती. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वॉटर युटिलिटी कंपनीने पैसे घेऊनही पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतले नव्हते. ओमप्रकाश बकोरिया यांनी महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच समांतर योजनेची चौकशी करून वॉटर युटिलिटी कंपनीशी केलेला करार रद्द केला. तेव्हा पासूनच बकोरिया राजकारण्यांच्या हिटलिस्टवर होते.

बोगस फाईली, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चौकशा सुरु करून त्यांनी प्रशासनावर चांगला वचक बसवला होता. शहराची घडी व्यवस्थित बसवण्याच्या प्रयत्नात असतांनाच दोन दिवसांपूर्वी बकोरिया यांच्या बदलीचे आदेश धडकले आणि त्यांची बदली कशामुळे, कोणामुळे झाली या चर्चेला तोंड फुटले. बकोरिया अकोल्याला रवाना झालेत, तर नवे महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी देखील पदभार स्वीकारला. पण बकोरियांच्या बदलीची चर्चा मात्र अद्याप सुरुच आहे. 

"समांतर रद्द'चे परिणाम भोगावे लागतील-खैरे 
शहराचा पाणी प्रश्‍न सुटावा यासाठी अथक प्रयत्नानंतर केंद्राकडून समांतर जलवाहिनीची योजना आणि 146 कोटींचा निधी मंजूर करुन घेतला होता. पण आयुक्त बकोरिया यांनी समांतरची वाट लावली असा आरोप शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. समांतरचा करार रद्द केल्याचे परिणाम शहराला व नव्याने आकार घेत असलेल्या डीएमआयसीला देखील भोगावे लागतील. केंद्राचा पैसा परत जाईल आणि ही योजना देखील अडचणीत येईल असा इशारा खैरे यांनी दिला. 
समांतर रद्द केल्यानेच बदली- सिरसाट 
मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया शहरात चांगले काम करत होते. समांतर जलवाहिनी योजेनेचे काम करणाऱ्या वॉटर युटिलिटी कंपनीवर त्यांनी कारवाई करत करार रद्द केला. तेव्हापासूनच त्यांना हटवण्यासाठी उच्चस्तरावरून राजकीय दबाव होता. बकोरिया यांच्या बदलीची मागणी कोणत्याही पक्ष, संघटनांनी केलेली नसताना चौदा महिन्यात त्यांची बदली करण्यात आली. या मागे "समांतर' हे एकमेव कारण असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट यांनी "सरकारनामा'शी बोलतांना केला 
शिवसेनेत जुंपली, भाजपचे ही मौन.. 
बकोरियांच्या बदलीनंतर शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार संजय सिरसाट यांच्यात अप्रत्यक्षरीत्या जुंपल्याचे दिसते. बकोरियांच्या बदली संदर्भात प्रसार माध्यमांकडे प्रतिक्रिया देतांना या दोन नेत्यांमधील वक्तव्यामध्ये परस्पर विरोध जाणवला. समांतरचा करार रद्द केला म्हणून बकोरियांची वेळेआधीच बदली केल्याचे सांगत सिरसाट यांचा रोख खासदार खैरे यांच्याकडे असल्याचे बोलले जाते. तर बकोरियांनी समांतर योजनेची वाट लावली असा आरोप करत एक प्रकारे खैरे यांनी बकोरियांच्या बदलीला योग्य ठरवल्याचे दिसते. बकोरियांना कुठल्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही अशी भूमिका घेणारे भाजपचे महापौर बापू घडामोडे देखील या बदली प्रकरणावर चुप्पी साधून आहेत. एकंदरीत सत्ताधारी शिवसेना-भाजपमधील काही नेत्यांना बकोरिया आयुक्त म्हणून नकोच होते हे आता स्पष्ट झाले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com